
पोलिसांनी प्रामाणिकपणे काम करायला हवे. तसे न केल्यास लोकांच्या विश्वासाला तडा जाईल, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने पोलीस प्रशासनाची कानउघाडणी केली.
कायदा-सुव्यवस्था राखणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. त्यांनीच एखादा गुन्हा केल्यास न्यायपालिकेच्या अखंडतेला बाधा होईल. सामान्य नागरिकांपेक्षा पोलिसांचे कर्तव्य मोठे आहे, याचा विसर होऊ देऊ नका, असेही न्या. डॉ. नीला गोखले यांनी बजावले.
दमण येथील गुन्हे शाखेने पाच मुलांना पकडले. सुटका करण्यासाठी त्यांच्याकडे 25 लाखांची मागणी केली. त्यातील पाच लाख घेतल्यावर पोलिसांनी त्यांना सोडले. त्यातील काही पोलिसांनी जामिनासाठी अर्ज केला होता. हा जामीन नाकारताना न्यायालयाने पोलिसांवर चांगलेच ताशेरे ओढले. पोलिसांचा गुन्हा गंभीर आहे. त्यांनी पदाचा गैरवापर केला. त्यांच्या वर्तनाने पोलीस प्रतिमा मलिन झाली आहे. त्यांना जामीन देता येणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले.


























































