
पक्षाचे नवे कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांचे वय 45 आहे. महापालिका निवडणुकीतही पक्षाकडून 35 ते 45 याच वयोगटातील उमेदवारांना संधी मिळेल. पक्ष करणार असलेल्या सर्वेक्षणात त्यापेक्षा जास्त वयाच्या उमेदवाराला पसंती दिसून आल्यास त्याचा विचार होईल, असा फतवाच ‘कॅसिनो’ फेम मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढला. बावनकुळे यांच्या या निकषामुळे भाजप कार्यालयासमोर रांगा लावणाऱ्या इच्छुकांच्या आनंदावर मात्र विरजण पडले आहे.
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे बुधवारी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी महानगरपालिका निवडणुकीचा आढावा घेतला. यावेळी एकेका प्रभागात पन्नासपेक्षा जास्त इच्छुक असल्याचे समोर आले. पंचविशीतल्या तरुणांपासून ते नव्वदी गाठलेल्यांनीही भाजपकडे उमेदवारीची मागणी केली आहे. इच्छुकांची गर्दी पाहून बंडखोरीची धास्ती भाजपला सतावत आहे. उपरे आणि निष्ठावंत असा संघर्षही भाजपमध्ये उफाळून आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपले नवीन कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन हे 45 वर्षांचे आहेत. पक्षानेही 35 ते 45 हा वयोगट उमेदवारीसाठी निश्चित केला आहे. मात्र अंतिम सर्वेक्षणात एखाद्या जास्त वय असलेल्या उमेदवाराला पसंती आढळून आल्यास त्याच्या नावाचा विचार होईल, असे म्हणत इच्छुकांवर बॉम्बगोळाच टाकला.
इच्छुक फणफणत बाहेर पडले
छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी भाजपकडे तब्बल 922 जणांनी उमेदवारी मागितली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी वयोगटाचा निकष सांगितल्यानंतर इच्छुकांचे चेहरेच पडले. काही इच्छुक तर वयाचाच निकष लावायचा होता तर आम्हाला कशाला पक्षात बोलावून घेतले, असे फणफणत बाहेर पडले. एका इच्छुक महिलेने तर ‘पक्षाच्या वयाच्या निकषात मी बसत नाही, त्यामुळे मला पदही नको आणि उमेदवारीही नको!’, असे म्हणत त्रागा केला.
महापालिका निवडणूक – काँग्रेसच्या उमेदवारीसाठी आजपासून मुलाखती
आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी मुंबई काँग्रेसमध्ये इच्छुकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहायला मिळाला होता. साधारण मुंबईभरातून एकूण 950 जणांनी पक्षाकडे आपले अर्ज सादर केले असून या इच्छुकांच्या मुलाखतींना गुरुवारपासून सुरुवात होणार असल्याची माहिती पक्षाचे प्रवत्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली. दरम्यान, येत्या दोन दिवसांत सर्व इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण करण्याचा पक्षाचा मानस असून त्यानंतर यासंदर्भातील एक सविस्तर अहवाल दिल्लीत सादर केला जाणार असून त्यानंतरच अंतिम उमेदवार यादी निश्चित केली जाईल, असे सांगण्यात येते.





























































