दोन वर्षे शिस्तीत रहा; अजितदादा गटाच्या आमदाराला न्यायालयाची तंबी! पोलिसांना शिवीगाळ करणे राजू कारेमोरे यांच्या अंगलट

सदनिका प्रकरणात न्यायालयाने ठोठावलेल्या कारावासाच्या शिक्षेमुळे अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकोटे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यातच अजितदादा गटाचा आणखी एक नेता संकटात सापडला आहे. भंडाऱ्याचे आमदार राजू कारेमोरे यांना पोलिसांना शिवीगाळ प्रकरणात दोषी ठरवत भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षे शिस्तीत राहण्याची तंबी दिली आहे.

तीन वर्षांपूर्वी आमदार राजू कारेमोरे यांच्या मित्राचे 50 लाख रुपये पोलिसांनी लुटल्याची घटना घडली होती, तेव्हा आमदारांनी पोलिसांना शिवीगाळ केल्याचे प्रकरण दाखल झाले होते. या प्रकरणात भंडारा जिल्हा सत्र न्यायालय द्वितीय श्रेणीच्या न्यायाधीश भारती काळे यांनी आमदार कारेमोरे यांच्यासह त्यांच्या चार सहकाऱ्यांना दोषी ठरवले. न्यायालयाने आमदार कारेमोरे आणि त्यांचे अन्य चार सहकारी आरोपींना पुढील दोन वर्षांत कुणासोबत वाद किंवा भांडण न करता समाजात लोकप्रतिनिधीला शोभेल अशी वागणूक ठेवण्याच्या अटी-शर्तीवर या प्रकरणातून सुटका केली आहे.

काय आहे प्रकरण?

आमदार राजू कारेमोरे 31 डिसेंबर 2021 रोजी यांचे मित्र यासीन छवारे आणि अन्य तीन जण वरठी येथून आमदार कारेमोरेंना भेटून तुमसरकडे जात होते. मोहाडी-तुमसर मार्गावर असलेल्या नगर पंचायत निवडणुकीच्या स्ट्राँग रूम परिसरात काही पोलिसांनी यासीन छवारे आणि त्यांच्या मित्रांची गाडी अडवून त्यांना मारहाण केली आणि त्यांच्या गाडीतील 50 लाख रुपये लुटल्याचा आरोप आमदार राजू कारेमोरे यांनी केला होता. या संतप्त प्रकरणानंतर आमदार राजू कारेमोरे 31 डिसेंबर 2021 च्या सायंकाळी मोहाडी ठाण्यात जाऊन त्यांनी पोलिसांना अश्लील शिवीगाळ केली. यात पोलिसांनी दाखल केलेल्या गुह्यानंतर आमदार कारेमोरे यांच्यासह त्यांच्या आरोपी चार सहकारी मित्रांना 3 जानेवारी 2022 मध्ये अटक केली होती.

आमदार राजू कारेमोरे यांना कलम 143, 294, 504 यात दोषी ठरविले, तर कलम 353 मध्ये निर्दोष मुक्तता करण्यात आली. लोकप्रतिनिधी आणि जनमानसात चांगली वागणूक आमदार राजू कारेमोरे यांच्यासह चारही आरोपींची असल्याचे न्यायालयाने नोंद घेत त्यांची दोन वर्षांच्या बंद पत्रावर मुक्तता केली.