
वांद्रे-वरळी सागरी सेतूवर ताशी 80 ची वेगमर्यादा असतानाही एका लॅम्बोर्गिनी कारचालकाने अक्षरशः वेगमर्यादेची सीमारेषा ओलांडून कार 252 ताशी वेगाने चालविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्या कारचालकाने याआधीसुद्धा दोन वेळा जवळपास दीडशेच्या वेगाने कार या सेतूवर चालविली होती. आपल्यासह इतरांच्या सुरक्षेची पर्वा न करता निव्वळ अतिरेकपणा करणाऱया त्या चालकाविरोधात वरळी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ती कार जप्त केली आहे.
पिवळय़ा रंगाची एक लॅम्बोर्गिनी कारचालक वांद्रे-वरळी सेतूवरून सुसाट नेत असल्याचा एक व्हिडीओ समाजमाध्यमावर प्रसारित झाला होता. मुळात त्या सेतूवर ताशी 80 किमी वेगमर्यादा असताना लॅम्बोर्गिनी कारचालकाने वेगाने हद्दच पार केल्याने याची वरळी पोलिसांनी गंभीर दखल घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून कारचा तपास सुरू केला. तेव्हा ही कार सुपर वेल कॉमट्रेड प्रायव्हेट लि. या नावाने नोंदणीकृत असून अहमदाबादचा रहिवासी असलेला नीरव पटेल हा त्या कारचा मालक आहे. तर खारमध्ये राहणारा फैज एडनवाला हा कारचा चालक आहे. फैज हा कारचा डीलरदेखील असून नीरवने कार त्याच्याकडे दिली होती.





























































