पुण्यात आंतराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, उच्चशिक्षित तरुणांचे पेडरलरशी कनेक्शन

पिंपरीतील एका सदनिकेत हायड्रोपोनिक गांजाची लागवड करून चालविण्यात येणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकत पुणे पोलिसांनी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला. पोलिसांनी एकसलग पुणे, पिंपरी, मुंबई आणि गोवा येथे छापे टाकून मेफेड्रोन, ओझीकुश (हायड्रोपोनिक गांजा), चरस, एलएसडी हे अमली पदार्थ जप्त केले असून, जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे साडेतीन कोटी रुपये आहे. याप्रकरणी पाच उच्चशिक्षित तरुणांना अटक करण्यात आली. या आरोपींचे थेट आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ पेडलरशी संपर्क असल्याचे तपासात उघड झाले आहे.

तुषार कर्मा, सुमीत डेडकाल, अक्षय महेर, मलय डेलीकाल आणि स्कराज भोसले अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपी उच्चशिक्षित असून, त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अमली पदार्थांची लागवड, साठवणूक आणि विक्री केल्याचे उघड झाले आहे. विशेषतः हायड्रोपोनिक गांजासारख्या महागड्या व उच्च दर्जाच्या अमली पदार्थांची निर्मिती करून ते शहरातील उच्चभ्रू तसेच महाविद्यालयीन तरुणांना लक्ष्य करत होते. आरोपी कर्मा अमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत कर्माने त्याचे साथीदार सुमीत डेडकाल व अक्षय महेर पिंपरी भागात वास्तव्यास असून तेथे हायड्रोपोनिक गांजाची लागवड सुरू केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

पाचगणीत 5 लाखांचे कोकेन जप्त

पर्यटनस्थळ अशी ओळख असलेल्या पाचगणीमध्ये ड्रग्ज रॅकेटचा काळा चेहरा उघड झाला आहे. सातारा गुन्हे शाखा आणि पाचगणी पोलिसांनी मध्यरात्री केलेल्या संयुक्त कारवाईत मुंबईतील 10 आरोपींना अटक करत 5 लाख रुपयांचे कोकेनसदृश अमली पदार्थ आणि 42 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पर्यटनस्थळांनाही ड्रग्ज माफियांनी टार्गेट केल्याचे स्पष्ट झाले आहे