मला नवे आयुष्य दिल्याबद्दल सीएसकेचे आभार दोन आयपीएलनंतर भाव मिळालेला सरफराज झाला भावुक

क्रिकेटच्या वाटेवर ज्याला पुन्हा उभं राहायचं असतं, त्याच्यासाठी एक संधीचं पाणी अमृत ठरतं. सरफराज खानसाठी ती संधी आली आणि तीही चेन्नईच्या पिवळय़ा जर्सीत. हिंदुस्थानच्या संघाबाहेर असलेल्या या फलंदाजाला चेन्नई संघाने खेळाडूंच्या लिलावात 75 लाख रुपयांच्या मूळ किमतीत घेतलं आणि सरफराजच्या कारकीर्दीला नवा श्वास मिळाला. या बोलीमुळे भावुक झालेला सरफराज खान म्हणतोय, ‘सीएसकेमुळे माझ्या क्रिकेटला नवे आयुष्य लाभलेय.’

गेल्या आयपीएलमध्ये सरफराज कुणीच किंमत दिली नव्हती, मात्र अबुधाबीतील लिलावात त्याला सीएसकेने उचलून धरलं आणि क्रिकेटच्या जगात पुन्हा एकदा ‘कमबॅक’चा ढोल वाजला. गंमत म्हणजे, लिलावाच्या काही तास आधीच सैयद मुश्ताक अली ट्रॉफीत 22 चेंडूंत 73 धावांची वादळी खेळी करूनही पहिल्या फेरीत त्याच्याकडे कुणी ढुंकूनही पाहिलं नाही. पण शेवटी धोनीच्या चेन्नईने हात दिला आणि सरफराजच्या करिअरला पुन्हा श्वास मिळाला.

मुंबईच्या या आक्रमक फलंदाजाने सोशल मीडियावर भावनांचा बांध फुटला. ‘मला नवे आयुष्य दिल्याबद्दल सीएसकेचे आभार. 2026 चा किताब जिंकून देण्यासाठी मी सर्वस्व ओतणार.’ ही भावना केवळ शब्दांची नव्हती, तर दोन हंगाम लिलावात अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूच्या मनात साठलेली वेदना होती. 2023 नंतर आयपीएलपासून दूर गेलेला सरफराज अखेर पुन्हा प्रकाशझोतात आला.

आंतरराष्ट्रीय पातळीवरही सरफराजचं नशीब फारसं साथ देणारं ठरलेलं नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावा रचूनही हिंदुस्थानच्या संघात त्याच्यासाठी दरवाजे कायमचे उघडले गेले नाहीत. सहा कसोटी सामन्यांत 37.10 च्या सरासरीने 371 धावा. त्यात 150 धावांची खेळी तरीही संधींचं गणित त्याच्याविरुद्धच गेलं.

आयपीएलमध्ये मात्र सरफराज अनुभवी आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्स, दिल्ली पॅपिटल्स असा प्रवास करत 2015 मध्ये त्याने पदार्पण केले होते आणि आता चेन्नई सुपरकिंग्स. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत यंदा त्याची फलंदाजी अक्षरशः आग ओकणारी ठरली. त्याने 82.25 ची सरासरीने 204.34 चा स्ट्राइक रेट, 329 धावा आणि एक शतक ठोकले.