ओणी – अणुस्कुरा मार्ग अद्यापही खड्डेमयच! अपघाताचा धोका कायम

राजापूर तालुक्यातील ओणी – अणुस्कुरा मार्गांवर काही ठिकाणी पडलेले खड्डे बुझविण्यात आले असले तरी रायपाटणपासून ओणी पर्यंत पडलेले खड्डे बुझविण्याचे काम अद्याप सुरु झालेले नाही. त्यामुळे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग मुहूर्त शोधतोय काय अशी खोचक विचारणा जनमानसातून होत आहे. आता हे खड्डे अधिकच रुंदावत असून खड्ड्याचा त्रास आणि उसळणारी धुळ अशा दुहेरी संकटाचा सामना वाहनचालकांसह प्रवाशांना करावा लागत आहे.

ओणी – अणुस्कुरा मार्गांवरील पडलेले खड्डे तात्काळ बुजवण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन काही दिवसांपूर्वी पूर्व परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले होते. मात्र अणुस्कुरा घाटापासून पाचलपर्यंत पडलेले खड्डे बुजविण्यात आले. त्यानंतर रायपाटणपासून ओणीपर्यंत पडलेले खड्डे तसेच असून ते बुझविण्याचे काम अद्याप सुरुझालेले नाही. या संपूर्ण मार्गांवर रायपाटणपासून ओणी पर्यंतच्या मार्गांवर मोठया प्रमाणावर खड्डे पडले असून यामध्ये रायपाटण, विरभद्र मंदिरापासून येळवण थांबा, कोळवणखडी घाटी पासून पेट्रोलपंप कोळवण खडी थांब्यापासून पुढील काही भाग, सौन्दल हायस्कुल पासून पाटिलवाडी रेल्वेस्थानक पर्यंतचा परीसर, दैतवाडीचा परीसर या परीसरात तर खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे.

सुरुवातीला रस्त्यात खड्डे पडले होते, आता तर पडलेले खड्डे पाहता खड्ड्यात रस्ता गेला असे म्हणण्याची वेळ आली आहे. मार्गांवर मोठया प्रमाणात खड्डे पडले असताना त्यातून वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. त्यातच उसळणाऱ्या धुळीमुळे त्रास वाढत आहे. त्यामुळे पूर्व परीसरातून प्रवास करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. संपूर्ण मार्ग खड्डेमय बनला आहे. यापूर्वी संबंधित विभागाला निवेदन देवून तात्काळ खड्डे बुझविण्याची मागणी करण्यात आली होती. आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला होता. पण अद्याप कार्यवाही काहीच झालेली नाही. मात्र त्याचा त्रास प्रवाशांसह वाहनचालकांना होत आहे.