
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील लोको पायलट, मोटरमन तसेच इंजीनियरिंग विभागातील कर्मचाऱयांचे कामकाज सुसह्य करा, सर्व विभागांत असलेली रिक्त पदे भरा, मध्य रेल्वेसह कोकण रेल्वेतील कामगारांच्या समस्या तातडीने सोडवा, अशा विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रेल कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी नवी दिल्लीत रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार यांची भेट घेतली व रेल्वे कर्मचाऱयांचे प्रश्न मांडले.
रेल कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या सूचनेनुसार शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उपनेते, सरचिटणीस दिवाकर (बाबी) देव, कार्याध्यक्ष संजय जोशी, प्रशांत कमानकर, तुकाराम कोरडे यांनी सतीश कुमार यांची भेट घेतली. यावेळी मध्य रेल्वेतील लोको- ट्रफिक रनिंग स्टाफ, इंजिनीअरिंग, परळ वर्कशॉप व कोकण रेल्वे कामगारांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली.
अनेक रिक्त पदांमुळे साप्ताहिक सुट्टी वेळेवर न मिळणे, आठवडाभर रात्रपाळी करण्यास भाग पाडणे, मोटरमन आणि ट्रेन मॅनेजरवर असलेला कामाचा अतिरिक्त ताण, ‘स्पाड’अंतर्गत केली जाणारी कारवाई आणि शिक्षा, मोटरमनच्या कॅबमध्ये विविध प्रकारचे आवाज, कॅमेऱयांचा वॉच, एडब्ल्यूएसचा वार्निंग आवाज याचा मोटरमनच्या मानसिक आरोग्यावर परिणाम आदी समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले. त्याची गंभीर दखल घेत विविध मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊन कार्यप्रणालीत आवश्यक तो बदल करू, अशी ग्वाही कुमार यांनी दिली.
कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करा!
कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करून स्वतंत्र झोन निर्माण करा, अशी प्रमुख मागणी शिष्टमंडळाने केली. तसेच इंजिनीअरिंग विभागातील ट्रकमनची रिक्त पदे तातडीने भरा, 10 टक्के आणि 40 टक्के स्क्रीन झालेल्या ट्रकमनना परळ, भुसावळ आणि नागपूर येथील त्यांच्या वर्कशॉपला सोडण्यात यावे, आदी मागण्याही रेल्वे बोर्डाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या.





























































