पेन्शनसाठी नाबार्डचे माजी कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

नाबार्ड भरती, निवृत्तीवेतन सुधारणा, सरकारने मंजूर केलेल्या कुटुंब निवृत्तीवेतन सुधारणेतील विलंब आणि इतर निवृत्ती वेतनविषयक प्रश्नांवर ऑल इंडिया नाबार्ड रिटायर्ड एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशनने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेतर्फे येत्या 5 जानेवारीला एचओ आणि आरओ कार्यालयासमोर निवृत्तीवेतनधारक धरणे आंदोलन करणार आहे. तरीही हा प्रश्न मार्गी लागला नाही तर संसदेसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

ऑल इंडिया नाबार्ड रिटायर्ड एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशनचे देशभरात 3500 हून अधिक सदस्य असून ते देशभरातून सरकार व नाबार्ड व्यवस्थापनाच्या उदासीनतेविरुद्ध आंदोलन करत आहेत. 1 नोव्हेंबर 2017 पर्यंत निवृत्त झालेल्या नाबार्ड भरती कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन पुनरावलोकन कुटुंब निवृत्तीवेतन पुनरावलोकन आदी मागण्या संघटनेने केल्या आहेत.
व्यवस्थापनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले

कुटुंब निवृत्तीवेतन पुनरावलोकनास मंजुरी मिळून 30 महिने उलटूनही नाबार्ड व्यवस्थापनाने प्रत्यक्ष वाढ लागू केलेली नाही. आरबीआयच्या धर्तीवर ‘अप्पर सीलिंग’ काढून टाकण्याबाबतही कारवाई झालेली नाही. अत्यल्प निवृत्तीवेतनावर जगणाऱया ज्येष्ठ नागरिकांच्या कुटुंबीयांना यामुळे आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागतेय. व्यवस्थापनाने त्यांच्या यातनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे, अशी नाराजी संघटनेचे अध्यक्ष यू. के. मोहंती यांनी व्यक्त केली.