
बीसीसीआयने सर्व हिंदुस्थानी आंतरराष्ट्रीय खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट आदेश दिले होते. त्यामुळे यंदा हजारे ट्रॉफीला चांगेलच ग्लॅमर लाभले आहे. मात्र असे असतानाच मुंबईच्या प्राथमिक संघातून रोहित शर्मा, यशस्वी जैसवाल, टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव आणि अष्टपैलू शिवम दुबे यांना वगळण्यात आल्याने वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे. मुंबईचा संघ पाहून सारेच संभ्रमावस्थेत पोहोचले आहे.
मुंबईचा विजय हजारे ट्रॉफीतील प्रवास 24 डिसेंबरपासून सुरू होत असून संघाला एलिट गट ‘क’ मध्ये स्थान देण्यात आले आहे. जयपूर येथे सर्व साखळी सामने खेळवले जाणार आहेत. अनुभवी अष्टपैलू शार्दुल ठाकूरकडे यंदा संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
मुंबईच्या निवड समितीने या वगळण्यावर स्पष्टीकरण देताना त्यांचे दरवाजे पूर्णपणे बंद नसल्याचे स्पष्ट केले आहे. उपलब्धतेनुसार हिंदुस्थानी आंतरराष्ट्रीय खेळाडूंना नंतर संघात सामील करून घेतले जाऊ शकते, असे संकेत देण्यात आले आहेत. यशस्वी जैसवालच्या बाबतीत फिटनेसचे कारण पुढे आले असून आजारातून सावरल्यानंतर त्याच्या तंदुरुस्तीचा अंतिम आढावा घेतला जाणार आहे.
क्रिकेट चाहते संभ्रमात…
बीसीसीआयने देशांगर्तत क्रिकेटवर भर देण्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या प्राथमिक संघाची बातमी क्रिकेट चाहत्यांना संभ्रमात टाकणारी आहे. दिल्लीच्या संभाव्य संघात विराट कोहली खेळत असल्याचे वृत्त आहे आणि रोहितसह अन्य स्टार खेळाडूसुद्धा हजारे करंडकानिमित्त मैदानात उतरतील, अशी आशा आहे.




























































