
खासगी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱयाला तीन अपत्ये असली तरी त्याच्या जागेवर त्याच्या मुलाला अनुकंपा नोकरीचा लाभ मिळू शकेल, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.
सांगली येथील संजय खांडेकर यांनी यासाठी अॅड. संजय माने यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. त्यांचे वडील एका खाजगी अनुदानित शाळेत शिपाई म्हणून काम करत होते. त्यांना तीन मुले आहेत. वडिलांच्या निधनानंतर संजय यांना शाळेने अनुंकपा तत्त्वावर नोकरी दिली, मात्र त्याला शिक्षण अधिकाऱयाने मान्यता देण्यास नकार दिला. त्याला या याचिकेत आव्हान देण्यात आले होते.
न्या. मकरंद कर्णिक व न्या. अजित काडेठाणकर यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.
तीन मुले असलेल्या कर्मचाऱयाच्या मुलाला अनुकंपा नोकरीचा लाभ देता येत नाही. तसा नियम राज्य शासनाने तयार केला आहे. त्यामुळे संजय यांच्या प्रस्तावाला मान्यता देता येणार नाही, असा दावा शिक्षण विभागाने केला.
मात्र हा नियम खासगी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱयांना लागू होत नाही, अशी कबुली माहिती अधिकारात स्वतः प्रशासनाने दिल्याचे अॅड. माने यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने संजय यांची मागणी मान्य केली.
लाभ देण्याचे आदेश
संजय यांना अनुकंपा नोकरीचा लाभ द्या. त्यांच्या पदासाठी पाठवण्यात आलेल्या प्रस्तावाला मंजुरी द्या, असे आदेश न्यायालयाने शिक्षण विभागाला दिले आहेत.



























































