
>>दुर्गेश आखाडे
मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास आणि भूगोल या विषयांप्रमाणेच चित्रकलेचा तासही तितकाच महत्त्वाचा असतो. ज्या दिवशी चित्रकलेचा तास असतो, त्या दिवशी शाळेत जाताना विद्यार्थ्याला पूर्वतयारी करूनच शाळेत जावे लागते. म्हणजे कागद, पेन्सिल आणि रंगपेटी दप्तरात आठवणीने भरून ठेवावी लागते.चित्रकला हा अनेक विद्यार्थ्यांचा आवडीचा विषय असतो. अशा वेळी 35 मिनिटांच्या चित्रकलेच्या तासात विद्यार्थ्यांच्या आवडीला वाव मिळत नाही. कधी चित्र काढून होतं, तर कधी चित्र रंगवायचे राहून जाते. ही गोष्ट लक्षात घेऊन रत्नागिरीतील फाटक हायस्कूलचे चित्रकला शिक्षक नीलेश पावसकर यांनी `अभिनव सफर रंगांची’ हा उपक्रम सुरू केला.
रत्नागिरी शहरापासून जवळच्या निसर्गरम्य ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना नीलेश पावसकर यांनी चित्रकलेचे धडे द्यायला सुरुवात केली. निळ्याशार आभाळाखाली बसून कॅनव्हासवर निळ्या रंगाच्या छटा रेखाटण्याची अपूर्वाई विद्यार्थी अनुभवतात. हिरव्यागार निसर्गात बसून हिरव्या रंगाची शीतलता त्यांना कागदावर अनुभवता येते.सुट्टीच्या दिवशी हे विद्यार्थी सकाळी लवकर उठून चित्रकलेचे साहित्य घेऊन नीलेश पावसकर यांच्या सोबत नियोजित ठिकाणी पोहोचतात. त्या ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यात बसून चित्र काढतात. चित्र रेखाटताना निसर्गाच्या सौंदर्यातील रंगछटांचे बारकावे शिकतात. वर्गाच्या चार भिंतींत राहून ज्या गोष्टी शिकता येत नाहीत, त्या गोष्टी निसर्गाच्या सान्निध्यात विद्यार्थ्यांना शिकायला मिळतात. एखादी वस्तू दुरून कशी दिसते आणि जवळून कशी दिसते याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना चित्र काढताना मिळते. शहरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यानिमित्ताने ग्रामीण जीवन अनुभवता येते आणि त्याचे सुंदर चित्रही रेखाटता येते. पशुपक्षी, पानंफुलं आणि माणसं अनुभवताना विद्यार्थ्यांमध्ये कलात्मक दृष्टिकोन निर्माण होतो. उद्याचे प्रतिभावंत चित्रकार घडविण्याचे कार्य ही `सफर रंगांची’ मोहीम करत आहे. थोडी धमाल मस्ती करत हा सुट्टीच्या दिवशी चित्रकलेचा तास भरतो.
आजकाल विद्यार्थ्यांमध्ये डॉक्टर आणि इंजिनीअर होण्याकडे कल अधिक असतो. किंबहुना पालक त्यादृष्टीने आपल्या पाल्याची तयारी करत असतात. अशा वेळी चित्रकला हे विषय पर्यायी ठरतात.मात्र चित्रकला हा विषय विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व विकास करणारा आहे. चित्रकलेच्या तासातून सर्वच चित्रकार होतील असं नाही, पण चित्रकलेतून त्या विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती, विचारशक्ती आणि निरीक्षण शक्ती विकसित होत असते आणि त्याचा फायदा त्याला आयुष्यभर होतो. हाच दृष्टिकोन समोर ठेवून कला शिक्षक नीलेश पावसकर यांनी आनंददायी शिक्षण देण्याचा हा उपाम सुरू केला आहे.
























































