बेरोजगारी! होमगार्डच्या नोकरीसाठी पदवीधरांच्या रांगा, 187 जागांसाठी 8 हजार उमेदवार धावपट्टीवर

ओडिशातील होमगार्डच्या पदासाठी पदवीधर आणि डिप्लोमा असलेल्या तरुणांनी रांगा लावल्याची घटना समोर आली आहे. या पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता केवळ पाचवी उत्तीर्ण अशी होती, परंतु बेरोजगारी असल्यामुळे अनेक शिकल्या सवरलेले मुले भरतीसाठी आली.

ओडिशात होमगार्डच्या एकूण 187 जागांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली होती. या भरतीसाठी हजारो उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी 8 हजार उमेदवार हे परीक्षेसाठी आले होते. ही परीक्षा 16 डिसेंबरला संबलपूर येथील जमादारपाली विमानतळाच्या धावपट्टीवर घेण्यात आली. होमगार्डची नोकरी मिळावी यासाठी हजारो अर्जदारांनी अर्ज केले होते. यातून निवडक उमेदवारांची निवड करण्यासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. सर्व उमेदवारांना एकाच वेळी परीक्षा देता यावी यासाठी ही परीक्षा विमानतळ धावपट्टीवर घेण्यात आली.

टेक्निकल आणि मॅनेजमेंटचे विद्यार्थी

होमगार्ड पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांमध्ये बहुतेक उमेदवार हे पदवीधर होते. काही जणांकडे तर टेक्निकल आणि मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर पदव्यादेखील होत्या, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. होमगार्ड भरतीत निवड झालेल्या उमेदवाराला सरकारकडून दिवसाला 639 रुपये डय़ुटी अलाऊन्स दिला जातो.