
काही पुस्तकांचा खास वाचकवर्ग असतो आणि या वाचकवर्गाचेही एकमेकांशी अनुबंध जुळलेले असतात. ऐतिहासिक विषयांची आवड असलेला वाचक असा एकमेकांशी जोडला गेलेला असतो आणि यामुळेच एखाद्या विषयावर आधारित पुस्तक येणार असेल तर त्याबद्दल उत्सुकता, त्याचं दमदार स्वागत आणि ते सर्वांपर्यंत पोहोचावं यासाठी केले जाणारे प्रयत्न दिसून येतात. असेच एक पुस्तक म्हणजे `जाँ बातीस्त तावर्निये यांच्या भारतातील प्रवास’ हे सत्येन वेलणकर, रोहित सहस्रबुद्धे, विनायक नेरलेकर यांनी अनुवादित केलेले आणि निखिल बल्लारीकर यांचा सहभाग असलेले हे पुस्तक ज्याची पुस्तक वर्तुळात चर्चा होत आहे. बेस्टसेलर ठरत असलेले हे पुस्तक जॉं बातीस्त तावर्निये या प्रेंच प्रवाशाच्या 16 व्या शतकातील भारतभेटीतील नोंदींवर आधारित आहे. परदेशी प्रवाशांनी लिहीलेल्या नोंदा इतिहास संशोधनासाठी महत्त्वाचे साधन ठरतात. मात्र या नोंदींची तितकीच तार्किक आणि शुद्ध चिकित्सा होणे गरजेचे असते. इतिहास लेखनात असे काम करणारा वर्ग आहे आणि अशी पुस्तके याचेच फलित आहे. या अभ्यासाच्या निमित्ताने इतिहास अभ्यासकांचे श्रद्धेय स्थान गजानन भास्कर मेहेंदळे यांचे काम हा लेखकवर्ग पुढे नेत आहे. अशा विषयांना अधिक बळ मिळावे व खरा इतिहास वाचकांपर्यंत पोहोचावा.





















































