Mumbai crime news – परदेशी नोकरीच्या नावाखाली फसवणूक; चार जण अटकेत, 190 जणांना गंडा

परदेशात चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत अनेकांची फसवणूक करणाऱया टोळीविरोधात समता नगर पोलिसांनी धडक कारवाई केली. या प्रकरणात एकूण आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करून चार जणांना अटक केली आहे.

सुमारे 190 जणांना रशियातील मॉस्को येथे चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देऊ असे सांगण्यात आले होते. बांधकामसह विविध क्षेत्रांत काम देण्याचे आश्वासन देत आरोपींनी प्रत्येकाकडून तब्बल पाच लाख रुपयांपर्यंत रक्कम घेतली. सर्वांचे विमान तिकीट कन्फर्म झाल्याचे सांगितल्यानंतर पीडित मुंबई विमानतळावर पोहचले. तेथे गेल्यावर आपली फसवणूक झाल्याचे अनेकांच्या लक्षात आले.

फसवणूक झाल्याचे समजताच काही पीडितांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून चौघांना अटक केली. कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींच्या बँक खात्यांतील 10 लाख रुपये गोठवले असून 70 हजार रुपये रोख जप्त केले आहेत. तसेच 118 पीडितांचे पासपोर्ट त्यांच्या मालकांना परत करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून उर्वरित आरोपींचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.