बनावट शासकीय कागदपत्रे व शिक्का बनवून देणारा सायबर कॅफे चालक गजाआड, कफ परेड पोलिसांची कारवाई

चारित्र्य पडताळणीकरिता आवश्यक असलेली शासकीय विभागांची कागदपत्रे तसेच शिक्क्यांचे बनावट करून देणाऱ्या एका सायबर चालकाला कफ परेड पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. आरोपीने अशाप्रकारे अनेक जणांना बनावट कागदपत्र बनवून दिली असल्याचे समोर येत आहे. कफ परेड पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

हसिना खातून या महिलेने कफ परेड पोलिसांत चारित्र्य पडताळणीसाठी अर्जासोबत आवश्यक शासकीय कागदपत्रे जोडली होती. पोलिसांनी ती कागदपत्रे तपासली असता ती बनावट असल्याचे आढळून येऊ लागले. त्यामुळे वरिष्ठ निरीक्षक सतिश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अमित देवकर, उपनिरीक्षक रुपेशकुमार भागवत व पथकाने हसिना हिने सादर केलेल्या कागदपत्रांच्या सत्यप्रतींची मागणी केली. मात्र हसिना हिस कोणतेही ओरिजनला कागदपत्र सादर करता आले नाही. त्यामुळे पथकाने तिला ताब्यात घेऊन कागदपत्रांबाबत सखोल चौकशी केल्यावर कफ परेडच्या गणेशमूर्ती नगरातील कम्युनिकेशन या सायबर कॅफेमध्ये ही कागदपत्रे बनवून घेतली असल्याचे हसिना हिने सांगितले. त्यानुसार देवकर व त्यांच्या पथकाने सायबर कॅफेवर छापा टाकून बनावट कागदपत्र बनवून देणाऱ्या कॅफे चालक सुजितकुमार ठाकूर (21) याला उचलले. त्याला पोलीस ठाण्यात आणून चौकशी केल्यावर त्याने एडिटिंग टुल व सॉफ्टवेअरचा वापर करून नागरिकांना बनावट कागदपत्र बनवून दिल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडे अधिक चौकशी सुरू आहे.