कृष्णाकाठी भरली विद्यार्थ्यांची ’पक्षीशाळा’, आमणापूरच्या कोंडार परिसरात पक्षी निरीक्षण

सांगली जिह्याच्या पक्षी नकाशावर महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमणापूर येथील कृष्णाकाठच्या कोंडार परिसरात शनिवारी विद्यार्थ्यांचा किलबिलाट पाहायला मिळाला. हिवाळी स्थलांतरासाठी येणाऱ्या पक्ष्यांचा हा परिसर सध्या ‘हॉटस्पॉट’ ठरत असून, ‘आनंददायी शनिवार’ आणि ‘राज्य पक्षी सप्ताहा’चे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पक्षी निरीक्षणाचा अविस्मरणीय अनुभव घेतला.

नेहमीच्या शालेय अभ्यासाच्या चौकटीतून बाहेर पडत आमणापूर केंद्रशाळा नं. एक व दोन, अनुगडेवाडी आणि शेरीमळा या शाळांमधील विद्यार्थ्यांनी पहाटेच्या प्रसन्न वातावरणात नदीकाठ गाठला.

या पक्षी निरीक्षणादरम्यान विद्यार्थ्यांनी स्थानिक आणि स्थलांतरित अशा दोन्ही प्रकारच्या पक्ष्यांच्या नोंदी घेतल्या. यामध्ये विद्यार्थ्यांना वटवटय़ा, वेडा राघू, पाणकावळा, हळदी-कुंकू बदक, ताम्रमुखी टिटवी, शराटी, काळ्या डोक्याचा शराटी, गायबगळा, भिंगरी, पाकोळी, समुद्री घार, ढोकरी बगळा, नदीसुरय, राखी व सामान्य खंडय़ा, खुल्या चोचीचा करकोचा, शेकाटय़ा आणि चमच्या अशा अनेक प्रजातींचे दर्शन घडले. विशेष म्हणजे पांढरा धोबी, करडा धोबी, ठिबकेदार तुतवार, कंटेरी चिकल्या आणि छोटा आर्ली यांसारख्या लांबवरून आलेल्या स्थलांतरित पाहुण्यांची उपस्थिती विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली.

यावेळी निसर्गप्रेमी आदम सुतार, केंद्रप्रमुख संभाजी पाटील, मुख्याध्यापिका सुनीता मोकाशी व नीता नरदेकर उपस्थित होते. तसेच शिक्षक अनिल जाधव, कविता सराटीकर, वर्षा ढेरे, सुनीता करपे, योगिता वसावे, स्वप्नाली भोसले, शशिकांत पाटील आणि धर्मेंद्र चांदणे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग आणि पर्यावरणाबद्दल गोडी निर्माण झाली असून, त्यांना विज्ञानाचे प्रत्यक्ष धडे मिळाले आहेत. शिक्षक संदीप कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले.

प्रेरणादायी उपक्रम

बालभारतीचे लेखक आणि पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांच्या संकल्पनेतून हा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. यावेळी संदीप नाझरे यांनी विद्यार्थ्यांना विविध जाती-प्रजातींचे पक्षी प्रत्यक्ष दाखवून त्यांचा अधिवास, सवयी आणि निसर्गचक्रातील त्यांच्या महत्त्वाविषयी सविस्तर माहिती दिली. पहाटेच्या निसर्गरम्य वातावरणात पक्ष्यांचा किलबिलाट ऐकत विद्यार्थ्यांनी या पक्षी विश्वाचा मनमुराद आनंद लुटला.