निवडणूक आयोग भाजपच्या इशाऱ्यावर काम करतोय! ममता बॅनर्जी यांचा आरोप

मतदार यादी फेरपडताळणीच्या पहिल्या टप्प्यानंतर प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीतून हजारो मतदारांची नावे गायब असल्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी संतापल्या आहेत. त्यांनी निवडणूक आयोगावर हल्ला चढवला आहे. ’निवडणूक आयोग भाजपच्या इशायावर काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

तृणमूल काँग्रेसच्या बूथ पाथळीवरील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. एकाच मतदारसंघातील दुसऱ्या पत्त्यावर स्थलांतरीत झालेल्या मतदारांची व लग्न झालेल्या महिलांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यातील एसआयआरमध्ये असंख्य त्रुटी आहेत. निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निरीक्षक हे पेंद्र सरकारचे कर्मचारी आहेत. राज्य सरकारशी सल्लामसलत न करता एसआयआर प्रक्रियेत त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयोगाने हे जाणीवपूर्वक केलेले आहे. त्यामुळे या लोकांवर बारीक लक्ष ठेवा. एकही योग्य मतदार वगळला जाणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन ममतांनी यावेळी केले.