
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील काँग्रेसच्या कामगिरीबाबत बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की निकाल प्रेरणादायी आहेत आणि पक्ष म्हणून आम्ही भविष्यासाठी आशावादी आहोत. “काँग्रेसने 41 अध्यक्षपदे आणि 1,006 नगरसेवक पदे जिंकली. कार्यकर्त्यांचे कष्ट आणि पक्षाच्या विचारधारेवरील विश्वासामुळे हे शक्य झाले. काँग्रेसचा मतदार पाया अजूनही शाबूत आहे आणि राज्यभरात काँग्रेस ही प्रमुख विरोधी शक्ती आहे, हे या निकालांनी स्पष्ट झाले,” असे त्यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
सपकाळ म्हणाले की, “ही लढत निष्पक्ष नव्हती. आम्ही महायुतीच्या पैसा आणि सत्ताबळाविरोधात लढत होतो. राज्य निवडणूक आयोग पक्षपाती होता आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच त्यांचे दोन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या दबावाखाली प्रशासनाने अनैतिक पद्धतीने काम केले.”
प्रशासन आणि निवडणूक आयोगावरच दोष देताय का, या प्रश्नावर ते म्हणाले, “या अतिशय स्थानिक पातळीवरील निवडणुकांमध्ये किती पैसा खर्च झाला, हे तुम्ही पाहिलं आहे का? शिंदे गटाने खर्च केलेल्या पैशातून एखाद्या गरीब देशाची अर्थव्यवस्था उभी राहू शकली असती. भाजपही त्याच पातळीवर आहे. हे थांबवण्यासाठी निवडणूक आयोगाने काय केलं? सत्ताधाऱ्यांकडून बिनविरोध निवडणुका घडवून आणण्यासाठी दहशत दाखवली गेली, ते सगळ्यांनी पाहिलं. त्यावर आयोगाने कोणतीही कारवाई केली नाही. प्रभाग रचनेतही सत्ताधाऱ्यांनाच फायदा करून देण्यात आला.”



























































