Unnao case – भाजपचा माजी आमदार बलात्कारी कुलदीप सेंगरला जामीन मंजूर, जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती

उन्नाव बलात्कार प्रकरणात भाजपचा माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर याला दिल्ली उच्च न्यायालयाने काही अटींसह जामीन मंजूर केला आहे. उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाने त्याला सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती सुब्रमोनियम प्रसाद आणि हरीश वैद्यनाथन शंकर यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला होता.

न्यायालयाने कुलदीप सेंगरला १५ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला आहे. तसेच तितक्याच रकमेच्या तीन जामीनदार सादर करावे लागतील, असं न्यालयाने सांगितलं आहे. यासोबतच काही अटीही लादण्यात आल्या आहेत.

या अटींसह न्यायालयाने सेंगरला जामीन केला मंजूर

  • सेंगर पीडितेच्या ५ किमीच्या परिसरात येणार नाही आणि दिल्लीतच राहणार.
  • सेंगर पीडितेला धमकावणार नाही.
  • सेंगर आपला पासपोर्ट ट्रायल कोर्टात जमा करेल.
  • दर सोमवारी पोलिसांसमोर हजार व्हावे लागेल.
  • कोणत्याही अटीचे उल्लंघन झाल्यास जामीन रद्द केला जाईल.

दरम्यान, उन्नाव येथे 4 जून 2017 रोजी पीडित मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. यानंतर तिच्या वडिलांचा कोठडीत मृत्यू झाला. 13 एप्रिल 2018 ला भाजप आमदार कुलदीप सेंगरला अटक करण्यात आली आणि सीबीआयकडून चौकशी झाली. त्यानंतर कारच्या अपघातात संशयास्पदरीत्या तिच्या दोन नातेवाइकांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दोषी आणि भाजपातून हकालपट्टी झालेला आमदार कुलदीपसिंग सेंगरला दिल्लीच्या तीसहजारी न्यायालयाने 20 डिसेंबर 2019 रोजी बलात्कार, अपहरण, लैंगिक शोषण आणि पोक्सोअंतर्गत विविध कलमान्वये आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली होती.