
पश्चिम रेल्वे मार्गावरील मोटरमन आणि ट्रेन मॅनेजरच्या प्रश्नांवर कर्मचाऱयांच्या संघटनांनी आक्रमक भूमिका घेताच रेल्वे प्रशासन ताळ्यावर आले आहे. मोटरमनवर ओव्हरटाईम, डबल डय़ुटीची सक्ती करणार नसल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सलग डय़ुटीमुळे मानसिक आणि शारीरिक त्रासाला तोंड देणाऱया मोटरमनना रेल्वेच्या नव्या धोरणामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
पश्चिम रेल्वेवर लोकल ट्रेनचे सारथ्य करणाऱया मोटरमन आणि ट्रेन मॅनेजरचे मनुष्यबळ अपुरे आहे. त्यामुळे मोटरमन आणि ट्रेन मॅनेजरना नियमित सुट्टय़ा न मिळणे, डबल डय़ुटी करण्याची सक्ती अशा समस्यांना तोंड द्यावे लागत होते. हे प्रश्न सोडवण्यासाठी लेखी निवेदने देण्यात आली होती, मात्र प्रशासन ढिम्मच होते. अखेर गेल्या आठवडय़ात चर्चगेट रेल्वे स्थानकातील लॉबीमध्ये मोटरमन, ट्रेन मॅनेजरनी निषेध बैठक घेतली. बैठकीत रेल्वे प्रशासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. त्यामुळे प्रशासनाने बहुतांशी मागण्या मान्य केल्या. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱयांनी सुधारित सूचना जारी केल्या आणि त्याची अंमलबजावणीही सुरू केली. मोटरमन-ट्रेन मॅनेजरवर ओव्हरटाईम, डबल डय़ुटीची सक्ती केली जाणार नाही. जे कर्मचारी स्वेच्छेने अतिरिक्त डय़ुटी करण्यास तयार असतील, त्यांनाच त्यांच्या इच्छेनुसार डय़ुटी दिली जाईल, असे वरिष्ठ प्रशासनाने कळवले आहे. डबल डय़ुटीच्या सक्तीतून सुटका झाल्याने मोटरमन आणि ट्रेन मॅनेजर्सना दिलासा मिळाला आहे.
19 नवीन मोटरमन लवकरच सेवेत रुजू
पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल फेऱयांच्या तुलनेत मोटरमनचे मनुष्यबळ अपुरे आहे. त्यामुळे मोटरमनवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. हा ताण कमी करण्याच्या दृष्टीने 19 नवीन मोटरमन सेवेत रुजू केले जाणार आहेत. नवीन मोटरमनना 1 जानेवारीपासून विरार कारशेड येथील प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे. ते पुढील दोन-तीन महिन्यांत पश्चिम रेल्वेच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.
चर्चगेट कॅण्टीनसाठी 15 दिवसांची डेडलाईन
चर्चगेट रेल्वे स्थानकातील मोटरमनच्या कॅण्टीनचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. ते कॅण्टीन सुरू करण्यासाठी आम्ही प्रशासनाला 15 दिवसांची मुदत दिली आहे. या अवधीत प्रशासनाने ठोस निर्णय घेतला नाही तर आंदोलन करावे लागेल, असे कर्मचारी संघटनेच्या एका पदाधिकाऱयाने सांगितले.




























































