
शालेय सहली विद्यार्थ्यांच्या बालपणातील संस्मरणीय क्षणांचा भाग असतात. सहलींचा आनंद लुटण्यासाठी आणि शाळकरी मुलांच्या मौजमजेसाठी एसटी महामंडळाने शैक्षणिक सहलींकरिता ‘स्पेशल बुकिंग’ची व्यवस्था केली आहे. सहलींसाठी नवीन बसेस उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
मुंबईतील एसटीच्या परळ, मुंबई सेंट्रल आणि कुर्ला आगारातून सहल स्पेशल गाडय़ांच्या बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील 20 दिवसांत 30 हून अधिक एसटी गाडय़ा सहलींच्या निमित्ताने विद्यार्थी सेवेत धावल्या आहेत.
विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव देण्यासाठी एसटी महामंडळाने यंदा नव्या बसेस उपलब्ध केल्या आहेत. तसेच तिकीट दरात 50 टक्क्यांची सूट दिली आहेत. त्याचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक शाळा, महाविद्यालये एसटी महामंडळाच्या आगारांत संपर्क साधत आहेत. विद्यार्थ्यांना मुंबई दर्शनबरोबरच महाराष्ट्रातील विविध धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनस्थळांना स्वस्तात भेट देता येत आहे. त्यामुळे सहल स्पेशल बुकिंगला वाढता प्रतिसाद असल्याची माहिती परळ आगार व्यवस्थापक नितीन चव्हाण यांनी दिली.
दादर, परळ परिसरात अनेक शाळा, महाविद्यालये आहेत. त्यामुळे सहलीसाठी परळ आगारातील गाडय़ांना अधिक प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबई सेंट्रल आगारातदेखील शैक्षणिक सहलींच्या बुकिंगला प्राधान्य देत असल्याचे आगार व्यवस्थापक वैभव कांबळे यांनी सांगितले. पूर्व उपनगरांतील शाळांना कुर्ला आगारातून सेवा दिली जात आहे. 20 दिवसांत कुर्ला आगारातून 15 नव्या ‘लालपरी’ शैक्षणिक सहलींसाठी उपलब्ध करून दिल्याची माहिती आगार व्यवस्थापक दीपक हेतांबे यांनी दिली.
एसटी अधिकारी शाळांच्या संपर्कात
शैक्षणिक सहली आणि एसटीचे जुने नाते आहे. हे नाते मुंबईसारख्या शहरी भागांतही अधिक दृढ करण्यासाठी एसटीचे अधिकारी वेळोवेळी शाळा, महाविद्यालयांच्या संपर्कात राहत आहेत. सहलींसाठी कोणत्याही क्षणी गाडय़ा उपलब्ध केल्या जात आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शाळांचा प्रतिसाद अधिक आहे. जानेवारीत मोठय़ा प्रमाणावर बसगाडय़ांना मागणी आहे. त्यासाठी एसटी महामंडळाने सज्जता ठेवली आहे.






















































