
पनवेल रेल्वे स्थानकाच्या परिसरातील विविध देखभाल आणि अभियांत्रिकी कामांसाठी मध्य रेल्वेमार्फत 24 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून 30 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत स्पेशल पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या आठवडाभराच्या ब्लॉकच्या अवधीत कोकण रेल्वे मार्गावरील अनेक मेल-एक्प्रेसचे वेळापत्रक कोलमडणार आहे. अप-डाऊन मेल लाईन्स, अप-डाऊन लूप लाईन्स, अप-डाऊन कर्जत लाईन्स, पनवेल स्थानकातील इंजिन रिव्हर्सल लाईन्स आणि प्लॅटफॉर्म 6 व 7 या मार्गांवर ब्लॉक असेल.
पनवेल-कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्सशी संबंधित अडथळे दूर करणे, पनवेल येथील पॉइंट क्रमांक 101 बी 4.5 मीटरने दिवा दिशेने सरकवणे, प्लॅटफॉर्म क्रमांक 5/6 आणि 7/8 दरम्यान पादचारी पुलाच्या गर्डरचे लाँचिंग तसेच स्टीलचे खांब व क्रॉस गर्डर उभारणे अशा कामांसाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकचा कोकण रेल्वे मार्गासह पुणे आणि सोलापूरच्या दिशेने ये-जा करणाऱ्या मेल-एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. त्यात मंगळुरू जंक्शन-सीएसएमटी एक्प्रेस, सीएसएमटी-करमाळी एक्प्रेस, एलटीटी-करमाळी एक्प्रेस, एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन एक्प्रेस, एलटीटी-मडगाव एक्प्रेस, तिरुवनंतपुरम-एलटीटी सुपरफास्ट एक्प्रेस, एर्नाकुलम-पुणे एक्प्रेस, दौंड-अजमेर सुपरफास्ट एक्प्रेस, तिरुवनंतपुरम–हजरत निजामुद्दीन एक्प्रेस, सोलापूर-एलटीटी एक्प्रेस, दौंड-ग्वाल्हेर एक्प्रेस या गाडय़ांचा समावेश असणार आहे. ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.






















































