शासनाचे आश्वासन हवेत; आता महावितरणचे वीज खंडित करण्याचे फर्मान! पोसरे दरडग्रस्त ग्रामस्थांची क्रूर चेष्टा

तालुक्यातील पोसरे खुर्द बौद्धवाडी येथील सात घरांवर दरड कोसळून 17 जणांचा बळी गेला. या दुर्घटनेस 5 वर्षांचा कालावधी लोटला तरीदेखील प्रशासनाने अद्याप त्यांच्या डोक्यावर हक्काचे छप्पर उपलब्ध करून दिले नाही. पुनर्वसनाचे आश्वासन हवेतच विरलेले असताना आता अलोरे येथे राहणाऱया नागरिकांसाठी महावितरणने विद्युत देयकासाठी वीज खंडित करण्याचे फर्मान काढले आहे.

प्रशासनाकडून पुनर्वसनासाठी जागेचा शोधदेखील घेण्यात आला. मात्र प्रत्यक्षात प्रशासन कागदी घोडे रंगवण्यातच दंग आहे. पीडित मात्र गेली अनेक वर्षे हक्काच्या छपराविना दिवस कंठत आहेत. 22 जुलै 2021 रोजी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पोसरे बौद्धवाडीवर काळाने झडप घातली. या दुर्घटनेनंतर दरडग्रस्त ग्रामस्थांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अजूनही दरडग्रस्त ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा  प्रश्न मार्गी लागलेला नाही. दरडग्रस्त ग्रामस्थांना अजूनही त्यांच्या हक्काची घरे उपलब्ध झालेली नाहीत.