
संगमेश्वर हे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचे व मध्यवर्ती ठिकाण असतानाही, संगमेश्वर चौकात वाहतूक व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचे चित्र रोज पाहायला मिळत आहे. पोलिसांच्या अनियमित कारभारामुळे येथे दररोज भीषण वाहतूक कोंडी होत असून, वाहनचालक व प्रवाशांना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.
संगमेश्वर चौकात चारही दिशांना अर्धा ते एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, अनेकदा नागरिकांना तासनतास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागत आहे. रुग्णवाहिका, शालेय वाहने, मालवाहू ट्रक यांनाही या कोंडीचा फटका बसत असून, अत्यावश्यक सेवांवरही याचा गंभीर परिणाम होत आहे. वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी वाहनचालकांकडून सतत कर्णकर्कश हॉर्न वाजवले जात असल्याने संपूर्ण परिसर दणाणून जात आहे. यामुळे ध्वनीप्रदूषणात मोठी वाढ होत असून, स्थानिक रहिवाशांचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे चौकात पोलिस चौकी असतानाही येथे नियमित वाहतूक नियंत्रण होत नसल्याचे स्पष्टपणे दिसून येते. एवढेच नव्हे तर महामार्गालगत, अगदी नजरेसमोर पोलीस ठाणे असतानाही वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या संपूर्ण प्रकाराकडे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी वैयक्तिक लक्ष घालून तात्काळ ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिक, वाहनचालक व व्यापाऱ्यांकडून होत आहे. केवळ कागदी उपाययोजना नव्हे, तर प्रत्यक्ष मैदानात उतरून वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण आणले जावे, अशी मागणी होत आहे.























































