मॅरिज ब्युरोच्या नावाखाली तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 2 मॅनेजरसह 20 तरुणींना अटक

ग्वाल्हेरमध्ये दोन हाय प्रोफाईल फेक मॅरिज कॉल सेंटरचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मायपार्टनर आणि यूनिक रिश्ते या दोन संकेतस्थळांवर लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या एका टोळक्याचा भांडाफोड केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 2 मॅनेजरसह 20 तरुणींना अटक केली आहे.

ही टोळी mypartnerindia.com और uniquerishtey.co या नावाने संकेतस्थळ चालवत होती. ज्यावेळी कोणी इंटरनेट यूजर वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करायचा, तत्काळ त्याची माहिती कॉल सेंटरमध्ये पोहोचायची. त्यानंतर कर्मचारी गुगलवरुन कोणत्याही सुंदर तरुणीचा फोटो डाऊनलोड करुन त्या व्यक्तीची जात आणि वयानुसार व्हॉट्सअॅपवर मुलीचा फोटो पाठवायचे. मुलगी आवडल्यानंतर ग्राहकाच्या प्रोफाईलनुसार त्याच्याकडून फी च्या नावाने पैसे वसूल केले जायचे. पैसे मिळाल्यानंतर कॉल सेंटरच्या तरुणी तिथे होणारी बायको बनून त्या ग्राहकाशी गप्पा मारायच्या.

एसएसपी धर्मवीर सिंह यादव आणि एएसपी सुमन गुर्जर यांच्या निर्देशानुसार गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी मयूर प्लाझा आणि द्वारिकाधीश मंदिराजवळ सामुहिक कारवाई केली, एका सेंटरवर 13 आणि दुसऱ्या सेंटरवर 7 तरुणींना चॅटिंग आणि कॉलच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक करताना आढळल्या. पोलिसांनी राखी गौर (24), मुरार आणि सीता उर्फ ​​शीतल चौहान (26) यांना अटक केली. टोळीचा मुख्य म्होरक्या तिलेश्वर पटेल सध्या फरार आहे. तो डेटा आणि वेबसाइट हाताळत होता. आरोपींकडून 45 मोबाईल फोन, 12 एटीएम कार्ड, 2 संगणक, सिम कार्ड आणि बँक चेकबुक आणि पासबुक जप्त करण्यात आले आहेत.

या टोळीने देशभरातील जवळपास पंधराशे लोकांची फसवणूक केली. प्रत्येक केंद्रावर त्यांचे मासिक उत्पन्न अडीच लाख ते तीन लाख रुपयांपर्यंत होते. 5 हजार रुपयांच्या पगाराव्यतिरिक्त, महिलांना लक्ष्य पूर्ण करण्यासाठी बोनस देण्यात येत असे. लग्न जुळवण्याच्या नावाखाली, आधी सदस्यता शुल्क आकारले  जायचे. तर भावी वधूशी संपर्क साधण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारले. या मुलींची येस बँक, एचडीएफसी, एसबीआय आणि अ‍ॅक्सिससह 10 हून अधिक बँकांमध्ये खाती असल्याचे आढळून आले. पोलीस आता या खात्यांची चौकशी करत आहेत.