प्रपोजल नाकारल्याने तरुणाने भररस्त्यात तरुणीचा केला विनयभंग, सोशल मीडियावर व्हिडीओ होतोय व्हायरल

कर्नाटकातील बेंगळुरु येथील ज्ञानज्योती नगरमध्ये एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका तरुणीने प्रपोजल नाकारल्याने भर रस्त्यात गाडी थांबून तरुणाने तिचा विनयभंग आणि मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नवीन कुमार एन असे त्या आरोपीचे नाव आहे. तो येलहंका जवळील बिलमरनहल्ली येथील रहिवासी आहे. पीडित महिला चिक्कमंगलुरू जिल्ह्यातील शृंगेरी येथील रहिवासी आहे. पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत महिलेने म्हटले आहे की, तरुणाशी इन्स्टाग्रामवर कामानिमित्त ओळख झाली. त्यांनी नंबर एकमेकांना दिले. मात्र तरुणाने त्याचे तिच्यावर प्रेम असल्याचे सांगितले, तिने नकार दिला. तिने नाकारल्याने आरोपीने तिचा पाठलाग आणि छळ करण्यास सुरुवात केली होती.

सोमवारी 22 डिसेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. सीसीटिव्ही फुटेजमध्ये एक तरुणी स्कूटरवर बसलेली दिसते आणि दुसरी तरुणी स्कूटरजवळ उभी असल्याचे दिसते. दरम्यान, आरोपी निळ्या रंगाची कार घेऊन रस्त्याच्या मधोमध उभे राहतो. त्यानंतर तो स्कूटरजवळ उभ्या असलेल्या तरुणीजवळ जातो आणि तिला दोन्ही हातांनी पकडतो.आरोपी अश्लील वर्तन करत तिचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करतो. तिला मारतोही. महिला मदतीसाठी ओरडताना दिसत आहे,मात्र घटनास्थळी असलेल्या लोकांपैकी कोणीही मदत करण्यास तयार नसल्याचे दिसते. पीडितेच्या तक्रारीवरून ज्ञानभारती पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.