
नायलॉन मांजाच्या वापराविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रुद्रावतार धारण केला आहे. वेळोवेळी आदेश देऊनही नायलॉन मांजाच्या वापरावर अंकुश बसत नसल्याने न्यायालयाने आता मांजा वापरणाऱया मुलाच्या पालकांना तसेच मांजा विक्रेत्यांना जबर दंडाची शिक्षा प्रस्तावित केली आहे.
नायलॉन मांजाचा वापर करणाऱया मुलाच्या पालकांना 50 हजार, तर मांजा विक्रेत्यांना अडीच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. प्रस्तावित शिक्षेसंदर्भात काही आक्षेप वा सूचना असतील तर सुनावणीला हजर राहून निवेदन सादर करावे, असेही खंडपीठाने म्हटले आहे. यासंदर्भात अंतिम निकाल 5 जानेवारी रोजी जाहीर केला जाणार आहे.
पोलिसांवरही कारवाई
कर्तव्यात हयगय करणाऱया पोलीस अधिकाऱयांवर कारवाई केली जाणार आहे. मांजामुळे घडणारे अपघात रोखण्यासाठी ठोस पावले न उचलणाऱया पोलीस अधिकाऱयांविरोधात कारवाई का करू नये, अशी विचारणा न्यायालयाने केली आहे. यासंदर्भात सर्व विभागांच्या डीसीपींसह सर्व अधिकाऱयांना सूचना जारी करण्याचे निर्देश न्यायालयाने पोलीस अधीक्षक आणि पोलिस आयुक्तांना दिले आहेत. यासंदर्भात गृह विभागाने जिल्हाधिकाऱयांना पत्र पाठवले आहे.




























































