
गेल्या दहा वर्षांपासून भारतातील सर्वच धर्मांत भयाचे वातावरण आहे. बाहेर ख्रिस्ती बांधवांवर हल्ले व नाताळचा सण उद्ध्वस्त केला जात असताना पंतप्रधान मोदी चर्चमध्ये घुसून बिशपबरोबर प्रार्थना करतात. प्रेम, शांतता, करुणेसाठी येशूकडे प्रार्थना करतात. याला ढोंग नाही, तर काय म्हणायचे? मोदी यांच्या भक्तांना भारताला हिंदू राष्ट्र बनवायचे आहे, पण ख्रिश्चन, मुसलमानांत भय निर्माण करून, त्यांच्यावर हल्ले करून ते शक्य नाही. भारतीय संविधानानुसार ‘भारतमाता की जय’ म्हणणाऱ्या सगळ्यांचाच हा देश आहे!
नाताळ सण आपल्या समाजात सद्भावना आणि बंधुभाव आणेल अशी आशा असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी नाताळनिमित्त देशातील ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा दिल्या. मोदी हे इतके भारावून गेले की, ते दिल्लीतील ‘कॅथेड्रल चर्च ऑफ रिडेम्पशन’ येथे नाताळनिमित्त सकाळच्या प्रार्थनेत सहभागी झाले. त्यांनी ‘येशू’ ख्रिस्ताची मनोभावे पूजा व प्रार्थना केली. या प्रार्थनेमुळे मोदी यांच्या मनात प्रेम, शांतता व करुणा यांची ऊर्जा निर्माण झाली. बिशप पॉल स्वरूप यांच्यातर्फे पंतप्रधानांसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. पंतप्रधानांनी चर्चमधील भाविकांसोबत कॅरोल गायन केले. पंतप्रधान बराच वेळ ख्रिस्ती भाविकांत रमले. चर्चमधून बाहेर पडताना मोदी यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता व चर्चमध्ये वावरताना पंतप्रधान जणू अयोध्या, मथुरा, द्वारकेत फिरत असल्याचा आव आणि भाव आणत होते. म्हणजे मोदी यांनी चर्चमध्ये जाऊन शुभेच्छा देण्याचे काम मनापासून केले हे मानावे लागेल, पण त्याच वेळी देशातील अनेक ठिकाणी मोदींना मानणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या झुंडी ‘नाताळ’ सण साजरा करणाऱ्या ख्रिस्ती बांधवांवर हिंसक हल्ले करीत होत्या. आसाम, छत्तीसगड व अन्य ठिकाणी नाताळनिमित्त करण्यात आलेल्या सजावटी उद्ध्वस्त केल्या गेल्या. सांताक्लॉजच्या प्रतिमा ओढून खाली खेचल्या व तुडवल्या गेल्या. अनेक शाळा, कॉलेजांत नाताळ एक उत्सव म्हणून साजरा होतो. तेथे जाऊन मोदीभक्त हिंदुत्ववाद्यांनी गोंधळ घातला व नाताळ साजरा करणाऱ्यांना धमक्या दिल्या. ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यास त्यांना भाग पाडले. नाताळचे सामान विकणाऱ्या दुकानांत व मॉलमध्ये घुसून हैदोस घातला. ठिकठिकाणी
चर्चसमोर बेबंद धिंगाणा
घातला व ख्रिस्ती बांधवांना धमकावण्यात आले. भारतातील हे चित्र भयावह आहे. गेल्या दहा वर्षांपासून भारतातील सर्वच धर्मांत हे भयाचे वातावरण आहे. बाहेर ख्रिस्ती बांधवांवर हल्ले व नाताळचा सण उद्ध्वस्त केला जात असताना पंतप्रधान मोदी चर्चमध्ये घुसून बिशपबरोबर प्रार्थना करतात. प्रेम, शांतता, करुणेसाठी येशूकडे प्रार्थना करतात. याला ढोंग नाही, तर काय म्हणायचे? भारतात आज कोणीच सुरक्षित नाही. काँग्रेस राज्यात ‘हिंदू खतरे में’ असल्याची बोंब जे लोक ठोकत असत तेच लोक मोदी राज्यातही पुन्हा हिंदू खतऱ्यात असल्याचे सांगत ख्रिश्चन आणि मुसलमानांवर हल्ले करीत आहेत. पंतप्रधान मोदींच्या राजवटीत मुसलमानांचे झुंडबळी गेले व ख्रिश्चनांच्या उत्सवांवर हल्ले सुरू झाले. नाताळनिमित्त मोदी इंग्लंडचे पंतप्रधान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, फ्रान्सच्या राष्ट्रपतींना शुभेच्छा देणार व स्वतःच्या देशात ख्रिश्चनांवर होणाऱ्या हल्ल्यांचा साधा निषेधही करणार नाहीत. पुन्हा आता जे ख्रिश्चनांवर हल्ले झाले ते भाजपशासित राज्यांत झाले हे महत्त्वाचे. एरवी ऊठसूट काँग्रेसवर डाफरणारे मोदी या हल्लेखोरांवर का डाफरले नाहीत, हे एक रहस्यच आहे. मोदी ‘इस्लामी’ देशांत जाऊन मेजवान्या झोडतात, तेथील मशिदीत जातात. इस्लामी राज्यकर्त्यांच्या गळाभेटी घेतात. इस्लामी राष्ट्रांशी व्यापार करतात, पण भारतात त्यांना मुसलमान नको. त्यामुळे हिंदू-मुसलमानांतली तणावाची आग ते राजकीय स्वार्थासाठी भडकवत ठेवतात. गोमांसावरून मुसलमानांचे झुंडबळी घेतले गेले, पण ख्रिश्चन बांधव भारतासह जगभरात ‘बीफ’ म्हणजे गोमांस खातात व गोव्यासारख्या
भाजपशासित राज्यात गोमांस
मुबलक प्रमाणात मिळते. त्याचे वावडे पंतप्रधान मोदी व त्यांच्या अंधभक्तांना नाही. गोमांस प्रकरणात मुसलमानांचे झुंडबळी गेले तेव्हा पंतप्रधान मोदी यांना ‘प्रेम, शांतता व करुणा’ या संदेशाचा विसर पडला. मुंबईचा महापौर ‘खान’ होईल, अशी भीती महाराष्ट्रातील मोदीवादी राज्यातील लोकांना घालत आहेत, पण संरक्षण खात्याची गुपिते विकणारे व लाच घेणारे जे लष्करी अधिकारी सापडले त्यात ‘खान’ नसून सर्व संघ परिवाराचीच ‘घाण’ आहे हे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानसारख्या राष्ट्राला संरक्षण खात्याची गुपिते देणारा कुरुलकर हा काही ‘खान’ नाही. तो मोदींचा भक्त आहे. अशा अनेक भक्तांचे मुखवटे गेल्या काही काळात गळून पडले. बेइमान, देशद्रोही हिंदुत्ववाद्यांपेक्षा प्रखर राष्ट्राभिमानी व देशासाठी छातीवर गोळ्या झेलणारे मुसलमान, ख्रिश्चन, पारशी परवडले. फिल्ड मार्शल माणेकशॉ यांनी 1971 साली पाकिस्तानचे तुकडे केले. जालियनवाला बाग हत्याकांड झाले तेव्हा खान अब्दुल गफार खान म्हणाले होते, ‘‘जर तुम्ही एका तरी मुस्लिमाच्या पाठीवर गोळी दाखवली तर मी स्वातंत्र्य लढ्यातून स्वतःच दूर होईन.’’ जालियनवाला बाग हत्याकांडानंतर दोन दिवस पोस्टमार्टेम चालले. 76 मुस्लिमांच्या छातीवर गोळ्या चालवल्या गेल्या होत्या, त्यातील एकही गोळी त्यांच्या पाठीवर लागली नव्हती हा इतिहास आहे. ख्रिश्चन, मुसलमानांवर हल्ले करणाऱ्यांनी हा इतिहास समजून घेतला पाहिजे. मोदी यांच्या भक्तांना भारताला हिंदू राष्ट्र बनवायचे आहे, पण ख्रिश्चन, मुसलमानांत भय निर्माण करून, त्यांच्यावर हल्ले करून ते शक्य नाही. भारतीय संविधानानुसार ‘भारतमाता की जय’ म्हणणाऱ्या सगळ्यांचाच हा देश आहे!
































































