
>> स्पायडरमॅन
इंटरनेटच्या आगमनानंतर मानवी आयुष्यात फार मोठी उलथापालथ झाली. कोणाला आपले आयुष्य सुखद झाल्याचे तर कोणाला इंटरनेटच्या आगमनानंतर आपण आळशी बनल्याचे वाटते आहे, पण इंटरनेटमुळे काही प्रमाणात आपले कष्ट वाचत आहेत हे मात्र नक्की खरे आहे. पूर्वी प्रवासाला जायचे म्हणजे आठवडाभर आधीपासून तिकिटाच्या रांगेत उभे राहून तिकीट बुक करण्यासाठी धडपडावे लागायचे. आता मात्र तिकीट बसचे असो रेल्वेचे किंवा विमानाचे, अगदी एका क्लिकवर आपण ते बुक करू शकतो. वेळ तर वाचतोच आणि कधी-कधी तिकीट दरात भरपूर सवलत मिळते ते वेगळेच. मात्र अशाच सवलतीच्या नादात एका विमान प्रवाशाला मोठी अडचण सहन करावी लागली आहे.
सैयद फहाद नावाच्या एका व्यक्तीने त्याचा दुःखद अनुभव सोशल मीडियावर लिहिला आहे. सैयदने दिल्लीवरून व्हिएतनामला जाण्यासाठी एका अॅपवरून विमानाचे तिकीट बुक केले. मात्र प्रवासाच्या अवघ्या एक दिवस आधी जेव्हा त्याने तिकिटाचे स्टेटस चेक करायचे ठरवले तेव्हा त्याला मोठा धक्का बसला. कारण विमान कंपनीच्या वेबसाईटवर त्याचे तिकीट अस्तित्वातच नसल्याचे दाखवत होते. त्याच्या तिकिटावरील पीएनआर नंबर कंपनीच्या रेकॉर्डमध्येदेखील दिसत नव्हता. हादरलेल्या सैयदने मग ज्या अॅपवरून तिकीट बुक केले होते त्याच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधला. त्यांनी हा संपूर्ण दोष विमान कंपनीचा असल्याचे सांगून हात झटकून दिले.
आता सैयदने आपला मोर्चा विमान कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राकडे वळवला. त्यांनी योग्य प्रक्रिया पूर्ण न झाल्याने तिकीट रद्द झाल्याचे कळवले आणि सगळा दोष सदर अॅपचा असल्याचे सांगितले. दोन्ही सेवा केंद्राकडून अशी उडवाउडवी होत असल्याने शेवटी सैयदने सोशल मीडियावर सर्व कहाणी कथन केली आणि मदतीची हाक दिली. लोकांनी त्याला सरळ अॅपविरुद्ध ग्राहक न्यायालयात जाण्याचा आणि तातडीने दुसऱ्या सुरक्षित अॅपवरून तिकीट बुक करण्याचा सल्ला दिला.























































