अहिल्यानगर–मनमाड महामार्गावर अपघात, अज्ञात वाहनाच्या धडकेत 19 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

अहिल्यानगर–मनमाड राज्य महामार्गावर दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोन तरुणांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने एका १९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना दि. २८ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास राहुरी तालुक्यातील डिग्रस फाटा परिसरात घडली.

नदीम आदम शेख (वय १९) व उमर अब्बास शेख (दोघे रा. डिग्रस, ता. राहुरी) हे दोघे आज दुपारी सुमारे १२.३० वाजता दुचाकीवरून राहुरीहून आपल्या घरी डिग्रसकडे जात होते. डिग्रस फाटा परिसरात त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात नदीम शेख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर उमर शेख हे जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच डिग्रस येथील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन दोघांना उपचारासाठी राहुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नदीम शेख यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. जखमी उमर शेख यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध सुरू केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे डिग्रस परिसरात शोककळा पसरली असून नगर–मनमाड महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या घटनांबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.