
एखाद्या ज्वेलर्सने स्वतःच्या इच्छेने सोन्याचे दागिने ग्राहकाच्या हाती पाहण्यासाठी दिले असतील, तर त्याला कायद्याने ‘विश्वासार्ह हस्तांतरण’ मानले जाईल. अशा परिस्थितीत ग्राहकाने फसवणूक करून दागिन्यांची चोरी केली तर विमा कंपनी नुकसानभरपाई देण्यास बांधील नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल जम्मू-कश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती संजीव कुमार आणि संजय परिहार यांच्या खंडपीठाने जम्मू आणि कश्मीर राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाचा आदेश रद्द केला.
विमा कंपनीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली.या वेळी खंडपीठाने विमा पॉलिसीमधील कलम 11(सी) कडे लक्ष वेधले. या कलमानुसार ग्राहकाने किंवा ज्या व्यक्तीकडे विमाधारकाने मालमत्ता सोपवली आहे अशा व्यक्तीकडून चोरी किंवा फसवणूक झाली, तर त्याचे संरक्षण विमा कंपनी देत नाही.
प्रकरण काय…
श्रीनगरमधील एका ज्वेलर्सने आपल्या दुकानाचा खासगी कंपनीकडे विमा उतवरला होता. 2018मध्ये दोन परदेशी नागरिक दुकानात आले. त्यांनी दुकानदाराचा विश्वास संपादन करून दोन सोन्याच्या साखळ्या पाहण्यासाठी घेतल्या आणि हातचलाखीने त्याऐवजी बनावट साखळ्या तिथे ठेवून पोबारा केला. या घटनेत आपले 51.66 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा दुकानदाराने केला होता. या प्रकरणी पोलीस तक्रारही दाखल करण्यात आली होती.
विमा कंपनीने दुकान मालकाचा दावा फेटाळून लावला. दुकानात बळजबरीने प्रवेश करून चोरी झालेली नाही, तर ही फसवणुकीची घटना आहे. अशा प्रकारची फसवणुकीची घटना विमा पॉलिसीच्या अटींमध्ये बसत नाही, असे कंपनीने स्पष्ट केले. पण ग्राहक आयोगाने दुकानदाराच्या बाजूने निकाल दिले. या निकालास विमा कंपनीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

























































