शनिभक्तांना पूजा साहित्यासाठी सक्ती केल्यास कारवाई, दुकानाबाहेर दराचे फ्लेक्स लावावेत; प्रशासक डॉ. गेडाम यांचा इशारा

तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर येथे भाविकांची पूजा साहित्यात मोठी लूट होत असल्याच्या तक्रारींची दखल घेत येथील व्यावसायिकांनी पूजा साहित्य दराचे मोठे फ्लेक्स दुकानाबाहेर लावावेत, भाविकांना सक्ती करू नये, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा नाशिक उपविभागीय आयुक्त, देवस्थानचे प्रशासक डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिला.

डॉ. गेडाम हे शनिशिंगणापूर येथे शुक्रवारी व शनिवारी दाखल झाले होते. त्यांनी दिवसभरात शनिशिंगणापूर देवस्थानच्या कर्मचारी व प्रमुखांची बैठक घेतली. त्यानंतर येथील व्यावसायिक गळेधारक मालकांची स्वतंत्र बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी शनिभक्तांची पूजा विक्रीमध्ये मोठय़ा प्रमाणात लूट होत असल्याच्या मोठय़ा तक्रारी आहेत, असे सांगून येथून पुढे भाविकांना सक्ती करू नये व कुठलेही पूजा साहित्य मोठय़ा किमतीमध्ये विकू नये, असा सज्जड इशारा दिला. शिवाय काही गोष्टी चांगल्या सुचवायच्या असतील तर सुचविल्या पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.

कमिशन एजंटबाबत त्यांनी गांभीर्यपूर्वक विचार करताना एजंटांचा बंदोबस्त तुम्ही स्वतः करा, अन्यथा देवस्थानला कठोर पावले उचलावी लागतील, असा इशारा दिला. डॉ. गेडाम यांनी शनिवारी पहाटे मंदिर परिसरातील पूजा साहित्य विक्रीच्या दुकानांना भेट देऊन विक्रीबाबत दर विचारले. गेडाम हे साध्या वेशात असल्याने दुकानदारांना कल्पना न आल्याने काहींनी त्यांना पाचशे रुपये, तर याहीपेक्षा ज्यादा दराच्या विक्रीचा अनुभव आला. त्यानंतर त्यांनी तातडीने मंदिर कार्यालयात बैठक आयोजित करून सर्व बाबींचा आढावा घेतला आणि कडक सूचना दिल्या.

कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती

शनिशिंगणापूर देवस्थानचा कारभार चव्हाटय़ावर आल्याने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने मंदिराच्या प्रशासकपदी आयुक्तांची नियुक्ती झाली. गेल्या आठ दिवसांपासून कर्मचारी विभागप्रमुख आदींची आयुक्तांकडून नोकरभरती कारभाराची झाडाझडती सुरू आहे. अनेक गंभीर बाबी पुढे येत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे, तर काही कर्मचारी मानसिक तणावात असल्याचे बोलले जात आहे.

आठ दिवसांत लेखी उत्तर हवे

शनि मंदिरात कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असल्याने मंदिराला एवढय़ा कर्मचाऱ्यांची गरज आहे का? कर्मचारी जास्त होत असतील तर तसे लेखी उत्तर द्यावे. हा प्रश्न उपस्थित करून देवस्थानच्या विभागप्रमुख व अधिकाऱ्यांनी आठ दिवसांत लेखी उत्तर द्यावे, असे आदेश त्यांनी काढले. यावेळी जिल्हाधिकारी पंकजा आशिया, उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे, प्रांताधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय बिराजदार आदी अधिकारी उपस्थित होते.