
नव्या वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्याकडे लोकांचा कल असतो. त्यामुळे वर्षाच्या पहिल्या दिवशी शिर्डी, अयोध्या, वैष्णोदेवी आणि तिरुपती अशा प्रसिद्ध देवस्थानांच्या ठिकाणी मोठी गर्दी उसळते. येत्या 1 जानेवारीला या मंदिरांमध्ये सुमारे 10 लाख भाविक हजेरी लावतील असा अंदाज आहे. त्या पार्श्वभूमीवर या मंदिरांमध्ये दर्शनाची खास व्यवस्था करण्यात आली आहे.
शिर्डी साई संस्थानाचे भक्त निवास 80 टक्के बुक झाले आहे. शिर्डीमध्ये 15 हजार भक्त थांबू शकतील, असा 46 हजार चौरस फुटांचा मंडप बांधण्यात आला आहे. वैष्णोदेवी मंदिराच्या गर्भगृहात प्रवेशासाठी यावेळी नवा स्कायवॉक सज्ज झाला आहे. अयोध्येत पायी येणाऱया भक्तांना 4 मार्गांनी मंदिरापर्यंत येता येणार आहे. लाइव्ह दर्शनासाठी शहरात 50 मोठय़ा एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या आहेत.
साईमंदिर रात्रभर खुले
शिर्डीत साईमंदिरात 6 लाख भाविक येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे 31 डिसेंबर रोजी मंदिर रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे. या दिवशी रात्री 10 वाजता होणारी शेजारती आणि 1 जानेवारीला सकाळी 5ः15 वाजता होणारी काकड आरती होणार नाही. व्हीआयपी दर्शनही बंद केले आहे.
रामनगरीत बुकिंग फुल्ल
रामनगरी अयोध्या मंदिरात 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी सुमारे 2 लाख भाविक येण्याचा अंदाज आहे. रोज दोन तासांच्या एका स्लॉटमध्ये 400 पास जारी केले जातात, जे 1 जानेवारीपर्यंत पूर्ण भरले आहेत. शहरातील सर्व मोठी हॉटेल्स फुल झालेली आहेत.
तपासणीनंतर प्रवेश
वैष्णोदेवी मंदिरात 1 लाख भाविक येण्याचा अंदाज आहे. कटरा येर्थे भाविकांच्या कागदपत्रांची तपासणी करून त्यांना रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन कार्ड देण्यात येते. कार्ड मिळाल्यानंतर 10 तासांच्या आत यात्रा सुरू करावी लागेल आणि 24 तासांत खाली परत यावे लागेल.
दर्शनासाठी टोकन हवे
तिरुपती मंदिरात 29 ते 31 डिसेंबरसाठी 1.89 लाख टोकन दिल्यानंतर काऊंटर बंद करण्यात आले आहेत. 30 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत फक्त अॅडव्हान्स बुकिंगचे टोकन असलेल्या भाविकांनाच दर्शनाची परवानगी मिळणार आहे.




























































