अंधेरीत भाजपमध्ये बंड, उपऱ्यांमुळे भरला अपक्ष अर्ज

राज्यभरात महायुतीमध्ये ‘बिघाडी’ होत असताना अंधेरीमध्येही उपऱयांमुळे संधी हुकलेल्या भाजपच्या सक्रिय कार्यकर्त्याने बंड पुकारून अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. वॉर्ड क्र. 82 मध्ये पक्षाने जुन्या निष्ठावंतांना डावलून काँग्रेसमधून आलेल्या माजी नगरसेवकाला उमेदवारी दिल्याने भाजपचे दीपक जयस्वाल यांनी अपक्ष अर्ज दाखल करीत शड्डू ठोकला आहे.

भाजपने काँग्रेसमधून आलेले माजी नगरसेवक जगदीश अमीन यांना वॉर्ड क्र. 82 मधून उमेदवारी जाहीर केली आहे. अमीन यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र गेली अनेक वर्षे पक्षात झेंडा खांद्यावर घेऊन काम केलेल्या कार्यकर्त्यांना डावलूनही दुसऱया पक्षातून आलेल्यांना उमेदवारी दिल्याने कार्यकर्त्यांमधून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या दीपक जयस्वाल आणि रुबी जयस्वाल यांनी ‘जिहाद मुक्त अंधेरी’चा नारा दिला आहे. या निर्णयामुळे भाजपच्या अधिकृत उमेदवाराची मात्र कोंडी होणार आहे.