
पतीविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार करत नुकसानभरपाई मिळावी यासाठी दंडाधिकारी न्यायालयात याचिका दाखल करणाऱया महिलेला दिलासा देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. पतीविरोधात याचिका दाखल केल्यानंतर संबंधित महिलेने दुसरा विवाह केला. त्यामुळे ती भरपाई मिळण्यास पात्र नाही, असे स्पष्ट करत कोर्टाने तिची याचिका फेटाळून लावली आहे.
पतीविरोधात नुकसानभरपाईच्या मागणीसाठी दाखल करण्यात आलेल्या खटल्यावर दंडाधिकारी न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी पतीने सर्व आरोप फेटाळून लावले व त्या महिलेसोबत तिचा घटस्पह्ट झाल्याचे न्यायालयाला सांगितले. तिने घर सोडल्यानंतर भरपाईची मागणी करण्याचा तिला अधिकार नसल्याचा युक्तिवाद त्याने केला. उलटतपासणी दरम्यान महिलेने 2008 साली तलाक दिल्याचे कबूल केले होते, असा दावा त्याने केला. त्याबाबतची कागदपत्रे पतीने सादर केली. त्यात महिलेने 17 डिसेंबर 2009 रोजी दुसरे लग्न केल्याचे दिसून आले. याची दखल घेत कोर्टाने महिलेला दिलासा देण्यास नकार दिला.
प्रकरण काय
याचिकाकर्त्या महिलेचा विवाह मार्च 2005 साली झाला. लग्नानंतर पती पंधरा दिवसांतच उत्तर प्रदेश येथे न सांगता निघून गेला. पतीने गावाला दुसऱया महिलेशी विवाह केल्याची माहिती लपवली. याबद्दल माहिती विचारली असता त्याने तिला लोखंडी रॉडने मारहाण केल्याची तक्रार महिलेने केली. इतकेच नव्हे तर गावी असलेली पतीची दुसरी पत्नी मुंबईत येऊन मारहाण करत असल्याचे तिने तक्रारीत म्हटले. या घटनेनंतर याचिकाकर्ती महिला वांद्रे येथे आपल्या आईच्या घरी राहू लागली. महिनाभरानंतर पती तिला घेण्यासाठी तिच्या घरी आला, मात्र त्यानंतर पतीकडून मारहाण सुरूच असल्याचा दावा तिने केला.

























































