
नववर्षाच्या स्वागतासाठी शहराजवळील डोंगररांगा तसेच घाटमाथ्यातील ठिकाणांना तरुणाईकडून अधिकची पसंती देण्यात येते. या तरुणाईकडून कोणत्याही प्रकारचा सामाजिक प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांनी अधिकचे लक्ष या काळात घाटमाथ्यांसह डोंगररांगांवर देण्याचे ठरवले आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठीची तयारी सर्वत्र सुरू झाली आहे. गोंगाटापासून दूर राहण्यासाठी अनेकांनी शहरालगतच्या डोंगररांगा तसेच घाटमाथ्यावरील ठिकाणांची निवड करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बुधवारी रात्री घाटमाथा युवकांसह सातारकरांच्या वर्दळीने गजबजून जाणार आहे. यवतेश्वरसह अजिंक्यतारा किल्ला, चारभिंत तसेच इतर डोंगररांगांत जमणाऱयांमुळे उत्साहाच्या भरात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. यामुळे या ठिकाणांवर पोलिसांचे लक्ष राहणार आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये, यासाठीही अग्निशमन दलासह इतर यंत्रणा सज्ज होत आहेत.
पोलिसांनी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राबविणाऱयात येणाऱया उपाययोजनांमुळे कोणत्याही प्रकाराचा धांगडधिंगा तसेच अनुचित प्रकारास पायबंद बसण्यास मदत होऊन नववर्ष स्वागताचा जल्लोष निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी काळजी घेतली जाणार आहे.
हॉटेल्स, ढाब्यांवरही लक्ष
– सातारा शहर, शाहूपुरी आणि सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने जास्तीचे लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या ठिकाणांवर गस्तीसह त्या ठिकाणांकडे जाणाऱया रस्त्यांवर तपासणी नाकेदेखील उभारण्यात येणार आहेत. शहरालगतची ठिकाणे तसेच यवतेश्वर, डबेवाडी, महामार्गालगतची हॉटेल, ढाबे यावरदेखील पोलिसांकडून जास्तीचे लक्ष या काळात ठेवण्यात येणार आहे. त्यासाठीचा आराखडा पोलिसांकडून करण्यात येत आहे.



























































