
”भाजप हा अदानी आणि व्यापाऱ्यांचा पक्ष आहे. त्यांचं राजकारण थैलीचं राजकारण आहे, इथून उचलायच्या आणि दिल्लीत नेऊन द्यायचा. पण आम्ही मुंबईचा सौदा होऊ देणार नाही, हाच आमचा या निवडणुकीचा अजेंडा आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
”दोन पक्षापेक्षा जास्त पक्ष एकत्र येतात तेव्हा ज्यांच्या जागा जातात त्या पक्षाचे त्या विभागातले प्रमुख कार्यकर्ते नाराज होतातच. पण कार्यकर्त्यांना समजावून सांगू. कार्यकर्ते शंभर टक्के राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांचं ऐकतील. आतापर्यंत उघड असं कुठेही नाराजी समोर आलेली नाही. या क्षणापर्यंत अद्याप कुणी रस्त्यावर आलेलं नाही ना. आम्ही कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन प्रत्येक गोष्ट सांगून त्यांची नाराजी दूर करू”, असे संजय राऊत म्हणाले. ”चाळीस चाळीस वर्ष ज्या पक्षाने तुम्हाला सर्व काही दिलं त्या पक्षाच्या विरोधात जाणं याला बंड म्हणत नाही. शिंदे गट पण बोलतात की आम्ही बंड केलं. पण तिथे जाऊन भाजपते बूटंच चाटतायत ना”, असा टोलाही राऊत यांनी यावेळी लगावला.
” त्यात गौतम अदानींना शरद पवारांनीच तरुण उद्योगपती म्हणून घडवलं. एखाद्या तरुण उद्योगपतीला जो घडवतो त्याच्यासोबत त्यांचे कौटुंबिक संबंध असतातच. तसे ते असतील तर त्यात आक्षेप घेण्यासारखं काही नाही. पण आमची अदानी सोबत मुंबई संदर्भातील नैतिक लढाई सुरूच राहिल. तो संघर्ष रस्त्यावरही येऊ शकतो. ज्या पद्धतीने मुंबईचा घास गिळण्याचा प्रयत्न अदानीच्या माध्यमातून भाजप करतोय. त्याचा विरोधात कायम लढा ठेवू. जे सोबत येतील त्यांच्यासोबत किंवा त्यांच्या शिवाय देऊ. ज्यांना मुंबई महाराष्ट्रात राहवी असे वाटत असेल ते सर्व येतील. भाजप हा अदानी व व्यापाऱ्यांचा पक्ष आहे. त्यांचं राजकारण थैलीचं राजकारण आहे, इथून उचलायच्या आणि दिल्लीत नेऊन द्यायचा. मुंबईचा व्यवहार होऊ देणार नाही, हाच आमचा या निवडणूकीचा अजेंडा आहे, असे संजय राऊत म्हणाले.




























































