
मुंबईत सुरू असलेल्या उभ्या, आडव्या बांधकामांमुळे प्रदूषण वाढते आहे. हवा अशुद्ध होते आहे आणि मुंबई महापालिका त्यावर ‘मिठी’ नदीची गुळणी घेऊन गप्प आहे. मुंबईच्या हवेत विष आहे. हे विष धुळीचे, घाणीचे व रसायनांचे आहे. मुंबईकरांची फुप्फुसे निकामी झाली आहेत. मुंबईच्या अनेक भागांतील कचरापट्ट्या व डम्पिंग ग्राऊंडमुळे मध्यरात्रीनंतर उग्र वास येतो. हवेची, पाण्याची गुणवत्ता त्यामुळे बिघडते. शुद्ध हवा आणि पाणी ही मोदी काळात चैनीची गोष्ट बनली आहे. मोदी सरकारला मुंबईचे गॅस चेंबर करून जनतेला गुदमरून मारायचे आहे. धारावीच्या पाडकामातून भाजप व अदानी नव्याने धुरळा उडवतील तेव्हा विषारी हवाही मृत होईल, एवढे ते प्रदूषण भयंकर असेल! सध्या हेच चित्र दिसते!
मुंबई शहराची भयंकर घुसमट सुरू आहे. मुंबईच्या हवेची गुणवत्ता ढासळली आहे. महाराष्ट्राची राजधानी व आंतरराष्ट्रीय शहर असलेल्या मुंबईची ही स्थिती चिंताजनक आहे. राजधानी दिल्लीतील हवेची स्थिती आणीबाणीसारखी आहे. हीच आणीबाणी मुंबईतही आली आहे. प्रत्येक नागरिकाला स्वच्छ हवेत श्वास घेण्याचा अधिकार असल्याचा निर्वाळा देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे, पण गेल्या दहा वर्षांत स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी, जीवनावश्यक औषधे म्हणजे चैनीच्या वस्तू झाल्या आहेत. नितीन गडकरी यांनी सांगितले की, दिल्लीत दोन ते तीन दिवस राहिल्यावर मला इन्फेक्शन होते. प्रदूषणात 40 टक्के वाटा वाहतूक क्षेत्रच पसरवत आहे. गडकरी यांनी अधूनमधून मुंबईतही मुक्काम करावा. म्हणजे प्रदूषणामुळे आबालवृद्धांना काय त्रास सहन करावा लागतो ते त्यांना कळेल. सुप्रीम कोर्टाने निरोगी पर्यावरणाचा अधिकार हा मूलभूत मानवी हक्क म्हणून मान्य केला. स्वच्छ हवेच्या अधिकाराची तरतूद घटनेच्या 21 व्या कलमात आहे. यात जीवनाच्या अधिकाराचा उल्लेख आहे. भारतातील वायू प्रदूषण रोखण्यासाठी, नियंत्रणात ठेवण्यासाठी 1991 मध्ये हवा प्रदूषण व नियंत्रण कायदा लागू करण्यात आला. ते सर्व कायदे राजकारणी, बिल्डर, जंगलतोड्यांनी मसणात घातले आहेत. मुंबईचे आरे जंगल हे शहराचे ‘फुप्फुस’ आहे. फडणवीस सरकारने विकासाच्या नावाखाली एका रात्रीत चारेक हजार झाडांची कत्तल केली. नाशिकच्या तपोवनात कुंभमेळ्याच्या नावाखाली दोन हजारांवर झाडे तोडली. उद्योगपती त्यांच्या व्यापारासाठी, खाण उद्योगासाठी डोंगर व झाडे तोडत आहेत आणि सरकार त्या पापात सहभागी आहे. मुंबईच्या विकासावर राजकीय भाषणे व गप्पा होतात, पण
मुंबईची भयंकर समस्या
प्रदूषणाची आणि गढूळ हवेची आहे. त्यावर राजकीय पक्ष बोलत नाहीत. मॉर्निंग वॉकसाठी मुंबईकरांना बाहेर पडता येत नाही. लहान मुलांना घेऊन बागेत जाता येत नाही. समुद्रकिनारे प्रदूषित झाले आहेत. तेथेही फिरता येत नाही. निसर्गाची पूर्ण वाट लावून व्यापार केला जात आहे. इटलीत बंदी आलेली ‘मिटेनी’ कंपनी आता सरकारमधील कोकणपुत्रांनी कोकणात लोटे परशुरामला आणली. या कारखान्यांमुळे इटलीतील साडेतीन लाख लोकांचे आरोग्य धोक्यात आले. या कंपनीला संपूर्ण युरोपात ‘विषाचा कारखाना’ मानले गेले. ज्या कंपनीमुळे संपूर्ण कोकणातील समुद्राचे विष होईल व लोकांत ‘कॅन्सर’चा प्रादुर्भाव वाढेल अशा कारखान्यासाठी कोकणात पायघड्या घालणारे मंत्री हे मानवतेचे शत्रू आहेत. मुंबई हा कोकणचाच भाग आहे. त्यामुळे हे विष उद्या मुंबईलाही बेजार करेल. आधीच मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक 200 अंकावर पोहोचला आहे, पण सरकार राजकारणात व फोडाफोडीत दंग आहे. हे अधिक चिंताजनक आहे. वाढत्या प्रदूषणामुळे सूक्ष्म कण श्वसन प्रक्रियेत खोलवर प्रवेश करतात. ते रक्त प्रवाहात मिसळतात. त्यामुळे दमा, श्वसन विकार, हृदय व रक्तवाहिन्यांवर ताण वाढतो. अर्धी मुंबई या आजारांनी त्रस्त आहे. जळजळ, खोकला, धाप लागणे या समस्यांनी बेजार आहे. राज्याच्या पर्यावरण व आरोग्य मंत्र्यांना या गंभीर स्थितीची खबर आहे काय? मुंबईतील डम्पिंग ग्राऊंडचे प्रदूषण धक्कादायक आहे. मेट्रो, बुलेट ट्रेनचे काम, त्यातून निर्माण झालेली धूळ, कचरा लोकांचे आरोग्य बिघडवत आहे. रस्त्यावर वाहनांचा महासागर उसळला आहे. त्या धुराने गॅस चेंबरसारखी स्थिती निर्माण झाली तरी मुंबई महापालिकेचे आयुक्त आड्याला तंगड्या लावून बसले आहेत. या
तंगड्या ओढण्याचे काम
मुंबई उच्च न्यायालयाने केले. महापालिका आयुक्त गगराणी यांना मुंबईतील प्रदूषणावर उच्च न्यायालयाने जाब विचारला व आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. मुंबई महानगरपालिका प्रदूषण नियंत्रणासाठी कोणत्या उपाययोजना करत आहे, धूळ नियंत्रणासाठी काय उपाययोजना केल्या, यावर पालिका उत्तर देऊ शकणार नाही. बांधकाम स्थळांवर धुळीचे लोट निर्माण होऊ नयेत यासाठी पाण्याची नियमित फवारणी करणे गरजेचे आहे. बांधकामासाठी आणलेले साहित्य झाकण्यासाठी हिरव्या जाळीचा म्हणजे ग्रीन नेटचा वापर करणे, रस्त्यावरून कचरा नेणाऱ्या गाड्या अत्यंत भयंकर अवस्थेत वाहतूक करतात ते थांबवणे आवश्यक आहे. नव्याने बांधून झालेल्या मोठ्या पुलांखालील कचऱ्याचे, मातीचे, सिमेंट विटांचे ढीग वेळेवर उचलले जात नाहीत. ते तसेच कायम असतात व ठेकेदार पुलाखालचा भाग स्वच्छ न करताच निघून जातात. त्यावर पालिका काय उपाययोजना करते? मुंबईत सुरू असलेल्या उभ्या, आडव्या बांधकामांमुळे प्रदूषण वाढते आहे. हवा अशुद्ध होते आहे आणि मुंबई महापालिका त्यावर ‘मिठी’ नदीची गुळणी घेऊन गप्प आहे. मुंबईच्या हवेत विष आहे. हे विष धुळीचे, घाणीचे व रसायनांचे आहे. मुंबईकरांची फुप्फुसे निकामी झाली आहेत. मुंबईच्या अनेक भागांतील कचरापट्ट्या व डम्पिंग ग्राऊंडमुळे मध्यरात्रीनंतर उग्र वास येतो. हवेची, पाण्याची गुणवत्ता त्यामुळे बिघडते. शुद्ध हवा आणि पाणी ही मोदी काळात चैनीची गोष्ट बनली आहे. मोदी सरकारला मुंबईचे गॅस चेंबर करून जनतेला गुदमरून मारायचे आहे. धारावीच्या पाडकामातून भाजप व अदानी नव्याने धुरळा उडवतील तेव्हा विषारी हवाही मृत होईल, एवढे ते प्रदूषण भयंकर असेल! सध्या हेच चित्र दिसते!
































































