
कोल्हापूर – महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा दिवस शेवटचा असल्याने वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज भरण्याचा मुहूर्त साधला. कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या आखाडय़ात दोन तृतीयपंथी उमेदवार उतरले आहेत. शिवानी गजबर आणि सुहासिनी देवमाने अशी या दोन तृतीयपंथी उमेदवारांची नावे आहेत.
माझी उमेदवारी ही कोल्हापूरकर व शहराच्या विकासासाठी आहे. राजकीय पक्षांनी जरी माझी उमेदवारी नाकारली असली तरी कोल्हापूरकर मला साथ देतील, असे तृतीयपंथी उमेदवार शिवानी गजबर यांनी सांगितले. आम आदमी पार्टी, वंचित आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तिसऱया आघाडीकडून शिवानी गजबर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर सुहासिनी देवमाने यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरून तृतीयपंथी समाजासह प्रभागाचे राहिलेले प्रश्न सक्षमपणे सोडवण्याचा प्रयत्न जनतेने निवडून दिल्यानंतर करणार आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी कोल्हापुरात जनता तृतीयपंथी उमेदवार निवडून देईल, अशी प्रतिक्रिया सुहासिनी देवमाने यांनी दिली आहे.

























































