
भाजपमध्ये उमेदवारी न मिळालेल्या नाराज कार्यकर्त्यानी सलग दुसर्या दिवशी आज बुधवारी प्रचार कार्यालयासमोर प्रचंड गोंधळ घालत राडा केला. मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. भागवत कराड हे वाहनातून कार्यालयासमोर येताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. भाजपमध्ये पीएला तिकीट, निष्ठावंताना धत्तुरा, भाजप मुर्दाबाद, सावे मुर्दाबाद अशा घोषणा देत मंत्री सावे, कराड यांच्या वाहनाला काळे फासले, मंत्री सावे यांचे फोटो फाडले. महिला कार्यकर्त्यांनी शिव्या, शाप देत रडारड केली. आल्या पावली सावे, कराड यांनी धूम ठोकली.
काल मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मिंधेगटासोबत युती तुटताच भाजपने स्वबळावर निवडणूक लढविण्यासाठी मध्यवर्ती प्रचार कार्यालयातून उमेदवारांची नावे जाहीर करीत एबी फार्म वाटप केले. परंतु, उमेदवारी नाकारलेल्या इच्छुक कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयात गोंधळ घालत राडा केला. मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. भागवत कराड यांनी उपर्यांना उमेदवारी देत निष्ठावंत आणि दिवसरात्र पक्षासाठी काम करणार्या जून्या कार्यकर्त्यांवर अन्याय केला, असा आरोप करीत कार्यालय डोक्यावर घेतले. त्यानंतर दिवसभर कार्यकर्त्यांचा गोंधळ सुरू होता.
आज बुधवारी दुपारी अकरा वाजेच्या सुमारास उमेदवारी नाकारण्यात आलेल्या नाराज कार्यकर्ते भाजप प्रचार कार्यालयावर धडकले. कार्यकर्त्यांनी भाजप व मंत्री सावे, कराड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. एवढयावरच न थांबता सावे, कराड एकाच वाहनातून कार्यालयासमोर येताच संतप्त व नाराज कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनाला काळे फासले व त्या दोघांचे फोटो फाडले. महिलांनीही शिव्या, शाप देत संताप व्यक्त करीत रडारड सुरू केली. पीएला तिकीट मिळाले, निष्ठावंताना धत्तूरा दिला. आता भाजप उमेदवारांचा पराभव केल्याशिवाय शांत बसणार नाही, कितीही झाले तरी आता भाजपला गाडणारच असा संताप कार्यकर्ते व्यक्त करीत होते. कार्यकर्ते संतप्त झाल्याचे पाहताच मंत्री सावे, कराड आल्या पावली पळून गेले. काही कार्यकर्त्यांनी पेट्रोल अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न देखील केला. पोलिसांनी तातडीने धाव घेत कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
भाजप शहराध्यक्षांच्या तोंडाला आला फेस
उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांची समजूत काढताना शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्या तोंडाला फेस आला. दिव्या मराठे यांनी कार्यालयातच उपोषण सुरू केले. त्यापाठोपाठ प्राची चव्हाण, वर्षा सांळुके यांनीही उपोषणात सहभाग नोंदवला. त्यांची समजूत काढण्यासाठी शहराध्यक्ष किशोर शितोळे गेले. परंतु, दिव्या मराठे यांनी स्वीकृत सदस्य करण्याची मागणी केली. ही मागणी शितोळे यांनी मान्य नसल्याचे सांगताच कार्यकर्ते पुन्हा संतप्त झाले.
भाजप कुणाच्या बापाचा पक्ष नाही
नाराज कार्यकर्त्यांचा प्रचार कार्यालयात गोंधळ सुरूच होता. भाजप पक्ष कुणाच्या बापाचा नाही, तिकीट देण्यासाठी पैशाची मागणी केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. स्वत: वर्षानुवर्षे पदे भोगतात, आम्हाला काही मिळत नाही. पक्षासाठी आम्हीही आयुष्य खर्ची घातले. तेच तेच नेते, त्याच त्याच कार्यकर्त्यांना तिकीट मिळतात याचा अर्थ काय? असा संतप्त सवाल कार्यकर्त्यांनी केला. आमदार संजय केनेकर हे कार्यकर्त्यांची समजूत काढत होते.



























































