
जर्मनीतील गेल्सेंकिर्चेन शहरात असलेल्या स्पार्कस बँकेत 290 कोटी रुपयांची चोरी झाली. चोरांनी बँकेच्या पार्किंग गॅरेजच्या भिंतीला मोठे भगदाड पाडले आणि थेट तिजोरीपर्यंत पोहोचले. चोरटयांनी 3,250 हून अधिक सेफ डिपॉझिट लॉकर तोडले आणि त्यातील रोकड व मौल्यवान दागिने घेऊन पळ काढला.
ख्रिसमसच्या सुट्टय़ांमध्ये बहुतेक दुकाने आणि कार्यालये बंद असतात. याचा फायदा घेत चोरटय़ांना डल्ला मारला. सोमवारी बँकेचा फायर अलार्म वाजल्यानंतर ही घटना उघड झाली. पोलिसांनी सांगितले की, बँकेच्या आसपास राहणाऱ्या काही लोकांनी शनिवार रात्रीपासून रविवार सकाळपर्यंत अनेक मुखवटा घातलेल्या लोकांना मोठय़ा पिशव्या घेऊन जाताना पाहिले होते. तसेच सीसीटीव्ही कॅमऱयांमध्ये काळ्या रंगाची ऑडी कारही दिसली आहे, ज्यात चोर बसले होते.
पोलिसांनी या संपूर्ण चोरीची तुलना
हॉलीवूड चित्रपट ‘ओशन इलेव्हन’शी केली आहे. अधिकाऱयांचे म्हणणे आहे की, इतकी मोठी आणि नियोजनाने केलेली चोरी अनेक दिवसांच्या तयारीशिवाय शक्य नव्हती.

























































