
बीड नगर पालिका ताब्यात घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी निवडणूक मोठी प्रतिष्ठेची केली. केवळ बीड शहरात दोन सभा आणि दोन बैठका त्यांना घ्याव्या लागल्या. नगर पालिका ताब्यात आली. नगराध्यक्षपद अजितदादांच्या गटाने राखले मात्र अजितदादा बीडमधून निघून जाताच दुसर्याच दिवशी नगराध्यक्षांच्या पदभार कार्यक्रमात ड्राम दिसला. उपनगराध्यक्ष पदासाठी अनेकांच्या आत्मिक इच्छा समोर आल्या. रूसवा फुगवी आणि मतभेदही उघड झाले.
बीड नगरपालिकेमध्ये आज नगराध्यक्ष प्रेमलता पारवे यांनी आपला पदभार स्विकारला. पदभार स्विकारण्यासाठी आ.विजयसिंह पंडित यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार गट आणि त्यांच्या मित्र पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये मोठा ड्रामा बीडवासियांना पाहाण्यास मिळाला. नगरपालिकेतील अजित पवार गटाचे गटप्रमुख फारूक पटेल यांची नाराजी स्पष्ट जाणवली. त्यांनी या कार्यक्रमामध्ये फेटा बांधून घेण्यासही नकार दिला. अंतर्गत भतभेद चव्हाट्यावर आले. रूसवा फुगवीही पाहाण्यास मिळाली. उपनगराध्यक्षपद आपल्याला मिळावे यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. प्रत्येकाच्या आत्मिक इच्छा या कार्यक्रमात प्रकर्षाने जाणवल्या. बीड नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. बीड शहरामध्ये दोन सभा आणि दोन बैठका त्यांना घ्याव्या लागल्या. त्यांच्या गटाचे १८ नगरसेवक निवडून आले. तर मित्र पक्षाचे ३ नगरसेवक विजयी झाले. अजितदादा गटाचा नगराध्यक्ष निवडून आल्याने दस्तुरखुद्द अजितदादा बीडवासियांवर जाम खूष होते. एक दिवसापूर्वीच ते बीडमध्ये कार्यक्रमासाठी येवून गेले. नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला काय काय विकास करायचा याची यादीही वाचून दाखवली. आणि दुसर्याच दिवशी त्यांच्या गटातील अंतर्गत कुरघोडी समोर आली.
नगरपालिका सजवली शहराचे काय?
नगराध्यक्ष प्रेमलता पारवे यांचा आज पदभार स्विकारण्याचा कार्यक्रम असल्याने नगरपालिका कार्यालय चांगलेच सजवले होते. संपूर्ण कार्यालयाला रोषणाई करण्यात आली होती. तोरण बांधले होते. रेड कॉरपेट अंथरण्यात आले. अध्यक्षांचे दालनही चकाचक करण्यात आले. कार्यालय सजवले होते मात्र बीड शहराचे काय, तीन वर्षापासून बीड नगर पालिकेवर प्रशासक आहे. तीन वर्षाच्या कालावधीत प्रचंड गैरकारभार आणि घोटाळे झाले आहेत. शहराला बकालतेचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. रस्त्या रस्त्यावर उर्किड्याचे ढिगारे पडले आहेत. कचराकुंड्या गायब आहेत. घंटागाड्या नियमित येत नाहीत. याकडे कधी लक्ष देणार असा प्रश्न विचारला जात आहे.




























































