
दापोली तालुक्यातील ऐतिहासिक बंदर म्हणून ओळख असलेल्या या बुरोंडी बंदराचा विकास आजही खितपत पडला असून त्याची झळ येथील स्थानिक मच्छीमार बांधवाना बसत आहे. ताज्या मासळीसाठी प्रसिद्ध असलेल्या या बुरोंडी बंदरावर होड्या लावण्यासाठी जेटीचे बांधकाम केले नसल्याने मासेमार बांधवांचे प्रचंड हाल होत आहेत.
मलपी परप्रांतीय फास्टर बोटींनी हैदोस घातल्याने तसेच एलईडी लाईटव्दारे केल्या जाणाऱ्या मासेमारींने येथील स्थानिक मासेमारांना एकतर मासळी मिळेनाशी झाली आहे. त्यामुळे ते आधीच संकटात सापडले आहेत. त्यातच समुद्रातून पागून आणलेली मासळी किनाऱ्यावर उतरताना होडया लावण्यासाठी जेटी नसल्याने आणखीन एका मोठ्या संकटाची त्यात भर पडली आहे. बुरोंडी बंदराचा विचार करता या बंदरात मासेमारी करणा-या साधारणपणे 135 च्या दरम्यान लहान मोठ्या होडया आहेत.
या होड्यांचे मालक आपल्या खलाशी नाखवांसह दररोज मध्यरात्री 2 ते पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास बंदरात मासेमारी करण्यासाठी जातात आणि साधारणपणे सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास समुद्राच्या पाण्यात पागलेली मासळी किनाऱ्यावर घेऊन परत येतात. ही मासळी घेऊन येताना बंदरावर जेटी बांधलेली नसल्यामुळे त्यांना मोठाच त्रास सहन करावा लागतो आहे. विकासाच्या मोठ्या बाता मारणा-यांना बंदरावर मासळी उतरताना मासेमारांना कशा संकटातून यावं लागतं याची कधीतरी प्रत्यक्ष बंदरावर येवून पाहणी करावी. जेटी बांधलेली नसल्यामुळे मोठ्या मरणयातना येथील प्रत्येक मासेमारांना दररोजच सहन कराव्या लागत आहेत.































































