
पश्चिम बंगालमध्ये एसआयआरवरून सुरू असलेला गोंधळ अजूनही थांबलेला नाही. निवडणूक आयोगाने एसआयआर प्रक्रियेअंतर्गत मसुदा मतदार यादी प्रकाशित केली आहे, परंतु मसुदा मतदार यादीत अनियमिततेच्या तक्रारी सुरूच आहेत. एसआयआर मुद्द्यावरून तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी हे सातत्याने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका करत आहे.
यातच शुक्रवारी दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील बरुईपूर येथे एका रॅलीत अभिषेक बॅनर्जी यांनी तीन मतदारांना मंचावर आणले, ज्यांना एसआयआरमध्ये मृत घोषित करण्यात आले आहे. यात दोन पुरुष आणि एक महिला आहे. मोनिरुल इस्लाम मोल्ला, हरेकृष्ण गिरी आणि माया दास, अशी यांची नवे आहेत.
या तीन लोकांना मंचावर बोलावल्यानंतर अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, “हे दोघे गृहस्थ मेतियाब्रुझमध्ये राहतात आणि या महिलेचे घर काकद्वीप मतदारसंघात आहे. तुम्हाला मंचावर चार लोक दिसतात, ज्यात मीही आहे, पण निवडणूक आयोग त्यांना पाहू शकत नाही. त्यांना मृत घोषित करण्यात आले आहे.” मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर हल्लाबोल करत ते म्हणाले, “जोपर्यंत आम्ही इथे आहोत तोपर्यंत आम्ही कोणाचेही मूलभूत अधिकार हिरावून घेऊ देणार नाही.”




























































