भूमिपुत्र असूनही आम्हाला हाकलण्याचा प्रयत्न झाला, कुलाब्यातील कोळीवाड्यातील रहिवाशांनी व्यक्त केला संताप

मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी खऱया अर्थाने सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा दिवस संपल्याने आता उमेदवार नागरिकांच्या भेटीला जाण्यासाठी तयार आहेत. कुलाब्यातील कोळीवाडय़ातील रहिवाशांनी आपल्या समस्या एका प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितल्या. आम्ही भूमिपुत्र आहोत, परंतु काही महिन्यांपूर्वी आम्हाला आमच्या जागेवरून हाकलून देण्याचा प्रयत्न झाला होता, असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.

आम्ही कोळीवाडय़ात कित्येक वर्षांपासून राहत आहोत. गेली 30 वर्षे या ठिकाणी मासे विक्रीचा व्यवसाय करते. मासे विक्रीसाठी आम्ही वस्तीच्या जवळ बसणार नाही तर कुठे बसणार, असा सवाल करत वास येतो म्हणून आम्हाला येथून हाकलून देण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला होता, असे एका महिलेने सांगितले. मासे विक्रीसाठी आम्हाला वस्तीच्या जवळपास जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही या महिलेनी केली आहे. कुलाब्यातील कोळीवाडा हा वॉर्ड क्रमांक 225 मध्ये येतो. या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार अजिंक्य धात्रक विरुद्ध भाजपच्या हर्षिता नार्वेकर यांच्यात लढत होणार आहे. या ठिकाणी सार्वजनिक शौचालयाचा वापर करण्यासाठी रोज 4 रुपये द्यावे लागतात. तरीही शौचालये नियमितपणे स्वच्छ केली जात नाहीत, अशी तक्रार महिलेने केली. सार्वजनिक कार्यक्रमासाठी तत्कालीन नगरसेवकांनी मोकळ्या जागेत लाद्या बसवून दिल्या, परंतु या ठिकाणी पुरेसा विकास करण्यात आला नाही. पाण्याचा, चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे, असेही त्या म्हणाल्या.