
मराठी माणूस आणि मुंबईच्या उज्ज्वल भविष्याचा वेध घेणारा शिवसेना-मनसे-राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा संयुक्त वचननामा उद्या प्रसिद्ध होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन मुंबईकरांना विकासाचे वचन देणार आहेत. ‘आपली मुंबई कशी असेल’ याचे चित्रच यातून स्पष्ट होणार आहे. मुंबईसह महाराष्ट्रात या पत्रकार परिषदेची प्रचंड उत्सुकता आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा मराठी चेहरा टिकवतानाच तिला जगाच्या नकाशावर नेण्यात शिवसेनेचे मोठे योगदान आहे. पाणीपुरवठा, मलनिःसारण, कचरा व्यवस्थापन, वाहतूक अशा मूलभूत सेवांपासून ते मैदाने, उद्याने, व्हर्च्युअल शिक्षण, कोस्टल रोड, मेट्रो अशा सेवांपर्यंत शिवसेनेने पालिकेच्या माध्यमातून मुंबईत विकासकामांचा डोंगर रचला आहे. कोरोना काळात शिवसेनेने पालिका व राज्य सरकारच्या माध्यमातून केलेले काम जगभरात वाखाणले गेले. असंख्य कामे करताना शिवसेनेने जपलेली आर्थिक शिस्त आणि मुंबई महापालिकेच्या तिजोरीत टाकलेली लाखो कोटींची भर हा जागतिक पातळीवर अभ्यासाचा विषय झाला आहे. या भक्कम पायावर आता कळस चढवला जाणार आहे. त्याचाच आराखडा उद्या युतीच्या वचननाम्यातून मांडला जाणार आहे. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व मनसे नेते अमित ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबईच्या विकासाचा जबरदस्त ‘रोडमॅप’ मांडल्याच्या पार्श्वभूमीवर हा वचननामा प्रसिद्ध होत आहे.
दणदणीत आणि खणखणीत संयुक्त मुलाखत
उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे दैनिक ‘सामना’ला संयुक्त मुलाखत देणार आहेत. येत्या 6 जानेवारीला ही मुलाखत होणार आहे, अशी माहिती ‘सामना’चे कार्यकारी संपादक शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली. ‘मुलाखत संयुक्त असल्याने मुलाखतकारही संयुक्त आहेत. माझ्यासोबत यावेळी अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर हे असतील. मांजरेकर यांनी राज ठाकरे यांची एक मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीत त्यांनी विचारलेल्या प्रश्नावरून ही संयुक्त प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे तेही मुलाखतीला असतील, असे संजय राऊत म्हणाले.
स्थळ – शिवसेना भवन, दादर
वेळ – दुपारी 1 वाजता


































































