भाजपच्या इच्छुक महिला उमेदवाराने एबी फॉर्म चोरला, शीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भाजपच्या दादर येथील वसंत स्मृती  कार्यालयातून प्रतीक्षा नगर येथील इच्छुक उमेदवार शिल्पा केळुसकर यांनी पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कार्यालय सचिवाकडून दिलेल्या तक्रारीवरून शीव पोलीस ठाण्यात शिल्पा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिल्पा केळुसकर यांना 29 डिसेंबरच्या सकाळी 10 वाजता भाजपाच्या वसंत स्मृती कार्यालयात बोलावून मुंबई भाजप अध्यक्षांच्या स्वाक्षरीने एबी फॉर्म देण्यात आला होता. पंरतु वॉर्ड क्रमांक 173 ची जागा दुसऱ्या पक्षाच्या उमेदवार पूजा कांबळे यांना द्यावयाची असल्याचे ठरल्याचे कळल्यानंतर शिल्पा केळुसकर यांना एबी फॉर्म पुन्हा कार्यालयातून घेऊन येण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी तो कार्यालय सचिव दिनेश जगताप यांच्याकडे सुपूर्द केला. जगताप यांनी तो एबी फॉर्म आपल्या ताब्यात घेऊन कार्यालयातील ड्रॉवरमध्ये ठेवला होता.

 तरीही तो फॉर्म निवडणूक कार्यालयात जमा

31 डिसेंबरच्या दुपारी पूजा कांबळे यांचे पती रामदास कांबळे यांनी वसंत स्मृती कार्यालयात जाऊन सांगितले की, शिल्पा केळुसकर यांनी प्रभाग क्रमांक 173 मधून भाजपचा एबी फॉर्म निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात जमा केला आहे. तेव्हा जगताप यांनी ड्रॉव्हरमधील फॉर्म पाहिला असता तो तेथे नसल्याचे आढळून आले. त्यावरून शिल्पा यांनी शिताफीने तो एबी फॉर्म चोरून तो परस्पर जमा केल्याने जगताप यांनी शीव पोलिसांत शिल्पा यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी केळुसकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.