
गुजरात संघाने साखळी फेरीत सलग दुसऱ्या विजयासह करसन घावरी चॅम्पियन करंडक वेस्ट झोन दिव्यांग टी-२० क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला. आता जेतेपदाच्या लढतीत त्यांच्यापुढे बलाढ्य महाराष्ट्राचे आव्हान असेल.
सिंहगड इन्स्टिट्यूट, लोणावळा येथील क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. साखळी लढतीत बरकतअली सय्यदने (४-१९) सुरेख गोलंदाजीच्या जोरावर गुजरात संघाने बडोदा संघाचा ३२ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना गुजरात संघाने २० षटकांत ७ बाद १७६ धावा केल्या. यात मुनाफ पाटलाने ३७ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने नाबाद ५३ धावा, तर परशुराम देसलेने २२ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह नाबाद ३४ धावा, प्रवीण वानखेडेने २१ धावा, याह्या पटेलने १६ धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला.
बडोदा संघाकडून धर्मेंद्रसिंह झाला (२-२७), अमित कुमार (२-३२), यश राठोड (१-२७) यांनी सुरेख गोलंदाजी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना बडोदा संघाचा डाव १८.५ षटकांत १४४ धावांवर संपुष्टात आला. यात विभा राबरी ४३, यश राठोड १०, जय राम १६, फिरोज खानजदा १६ यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. विजयी संघाकडून बरकतअली सय्यद (४-१९), प्रवीण वानखेडे (२-४३), चांगदेव शिरतार (१-२५) यांनी अचूक गोलंदाजी करत ३२ धावांनी विजय मिळवून दिला.
दुसऱ्या सामन्यात एम शाहिल हाश्मी (४६ धावा व २-१३) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर प्रेसिडेंट इलेव्हन संघाने सौराष्ट्र संघाचा ४२ धावांनी पराभव केला.



























































