महापालिका निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात 100 टक्के उलथापालथ होईल! – संजय राऊत

अजित पवार, एकनाथ शिंदे यांना सत्तेत घेतल्यामुळे भाजपला नक्कीच पश्चाताप झालेला आहे. पण दिल्लीतील दोन नेत्यांच्या हट्टाखातर ते आजही सत्तेत आहेत. पण ही तात्पुरती व्यवस्था आहे. शिंदे, अजित दादांना सोबत घेतल्याचा दिल्लीलाही पश्चाताप होतोय, पण ते दाखवत नाही. त्यांना काही दिवस ढकलायचे आहेत. खासकरून महापालिका निवडणूक ढकलायच्या आहेत. त्यानंतर हा पश्चाताप उघडपणे बाहेर येईल आणि महाराष्ट्राच्या राजकारणात 100 टक्के उलथापालथ होईल. तोपर्यंत त्यांचे सगळे लाड पुरवले जाईल, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत रविवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले. अजित पवारांना सोबत घेतल्याचा पश्चात्ताप होतोय, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले होते. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.

संजय राऊत म्हणाले, भाजपबरोबर सत्तेत असलेले अजित पवार हे भाजपच्या भ्रष्टाचारावर बोलताहेत आणि तरीही सत्तेत आहेत. हा एक महाराष्ट्राच्या राजकारणातील फार मोठा चमत्कार आहेत. माझ्यावर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करणाऱ्यांबरोबर मी सत्तेत आहे, असे ते सांगताहेत. त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबावर, सहकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप झालेले आहेत. त्यातल्या काही लोकांवर ईडीची कारवाई सुरू आहे. तरीही ते आरोप करणाऱ्यांबरोबर सत्तेत आहेत. पण हे ओझे भविष्यात भाजप फेकून देईल.

देवेंद्र फडणवीस हिंदू मराठी महापौर होईल असे म्हणत आहे. यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, थेट मराठी बोला ना. तुम्ही मध्येच हिंदू कशाला आणता. मराठी बोलताना जीभ लुळी पडतेय. आम्ही मराठी महापौर होईल असे बोलतोय. ही मुंबई, महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रात जन्माला आले, तर औरंगजेब गुजरातमध्ये जन्माला आला. त्यामुळे फडणवीस वगैरे यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, असा घणाघात राऊत यांनी केला.

शिवतीर्थावर शिवसेना-मनसेची सभा होऊ नये यासाठी सत्तेच्या गुळाला चिकटून बसलेल्या महायुतीच्या मुंगळ्यांचा रडीचा डाव सुरू! – संजय राऊत

राज्यात 66 नगरसेवक बिनविरोध झाले आहेत. पण कायदा, नियम सांगतो अशा प्रकारे बिनविरोध निवडणुका आता होऊ शकत नाहीत. कारण ईव्हीएमवर नोटाचे बटण असते. ते दाबण्याचा अधिकार प्रत्येक मतदाराला आहे. त्यामुळे रिंगणात ‘नोटा’ नावाचा उमेदवार आहे. त्या नोटाला बरेच अधिकार आहेत आणि निवडणूक रद्द सुद्धा होऊ शकते, असेही राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावरही टीका केली. निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचे मांजर असून त्यांनी त्यांची प्रतिष्ठा धुळीस मिळवली, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.

यावेळी संजय राऊत यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचाही प्रश्न उपस्थित केला. मंत्री भरत गोगावले यांचा पुत्र अजून फरार कसा? हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होऊन दीड महिन्या झाला असून अद्यापही तो महाराष्ट्राच्या पोलिसांना सापडत नसेल तर रायगडच्या जिल्हाप्रमुखांना जाब विचारला पाहिजे, असे राऊत म्हणाले. तसेच सोलापूरमध्ये मनसे पदाधिकाऱ्याची हत्या झाली असून महाराष्ट्राचे राजकारण कोणत्या दिशेला चालले हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारायला हवे. फडणवीस महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलणार बोलले, पण महाराष्ट्राचा चेहरा मोहरा त्यांनी भ्रष्ट केला. यांचे सगळे भ्रष्ट आणि खुनी चेहरे निवडणुकीत उतरवले आहेत, अशी टीका राऊत यांनी केली.